मुंबई – टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रामायणात प्रभु श्रीरामचंद्र यांचे घनिष्ठ सहकारी म्हणून रामायण मालिकेत भूमिका करणारे चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. त्यांनी रामायणामध्ये निषाद राज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते.
पंड्या यांच्या निधनाची माहिती रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेमध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या त्रिवेदी यांच्या जाण्यानं चाहत्यांना धक्का बसला होता. आता निषाद राज यांच्या जाण्यानं चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. चंद्रकांत पंड्या यांना चाहते बबला या नावानं ओळखत होते. त्यांचा जन्म 1946 साली गुजरात राज्यातील बनासकाठा जिल्ह्यातील भीलडी गावात झाला होता. त्यांचे वडील व्यापारी होते. ते गुजरातमधून मुंबईला व्यापारासाठी आले. तिथे त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आणि ते मोठे उद्योगपती झाले. चंद्रकांत यांचे शिक्षण मुंबईत झाले.

पंड्या यांनी रामायणाशिवाय काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. चंद्रकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ओळख अरविंद त्रिवेदी आणि उपेंद्र त्रिवेदी यांच्याशी झाली. त्यामुळे त्यांना मोठं व्यासपीठ मिळालं. कडू मकरानी या गुजराती चित्रपटातून पंड्या यांना ब्रेक मिळाला होता. मात्र त्यांना ओळख मिळाली ती रामायणातील निषाद राजची भूमिका साकारल्यानंतरच.
हेही वाचा: ‘रामायणा’त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन
Esakal