भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. मूळ स्पर्धेआधी भारताने दोन सराव सामने खेळले. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १९व्या षटकात तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १८व्या षटकात विजय मिळवला. या दोन सामन्यांनंतर टीम इंडियाला कायम नावं ठेवणारा माजी कर्णधार मायकल वॉन याने चक्क भारतीय क्रिकेट संघाची स्तुती केली.
हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाक सामन्याचे समालोचन मराठीतून!

मायकेल वॉन
भारतीय संघ गेल्या काही महिन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करून आला. कसोटी मालिका सुरू होण्याआधी मायकल वॉन याने भारतीय संघावर मनसोक्त टीका केली होती. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत ४-०ने पराभूत होईल अशी भविष्यवाणी त्याने केली होती. तर इंग्लंडविरूद्ध टीम इंडियाला मालिका जिंकणं अशक्य आहे असंही त्याने म्हटलं होतं. या दोन्ही गोष्टी खोट्या ठरल्या. त्यानंतर आता दोन सराव सामन्यात भारताने चांगली कामगिरी केल्यानंतर मायकल वॉनने एक ट्विट केलं. “ज्या पद्धतीचा खेळ भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये केला आहे, त्यावरून हे स्पष्ट दिसून येतं की यंदाचा टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया हा प्रबळ दावेदार आहे”, अशा शब्दात वॉनने चक्क भारतीय क्रिकेट संघाची स्तुती केली.
हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

रोहित-शर्मा-NZ
दरम्यान, भारताने पहिला सराव सामना इंग्लंडविरूद्ध खेळला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. पण इशान किशनच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने १८९ धावांचे आव्हान १९व्या षटकातच पार केले. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला १५३ धावांचे आव्हान दिले होते. त्यात रोहित शर्माने दमदार अर्धशतकी खेळी करून संघाला १८व्या षटकात विजय मिळवून दिला.
Esakal