T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. मूळ स्पर्धेआधी भारताने दोन सराव सामने खेळले. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १९व्या षटकात तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १८व्या षटकात विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य पाकिस्तानविरोधातील सामन्याआधी उंचावले आहे. या दरम्यान पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका कोणता याबाबत सांगितले.
हेही वाचा: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! T20 वर्ल्ड कपनंतर स्वीकारणार कार्यभार
“मी लोकेश राहुलला सुरूवातीपासून पाहतो आहे. त्याच्या खेळात झालेली सुधारणा मी स्वत: पाहिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताचा केएल राहुल हाच पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. तो जेव्हा युवा क्रिकेट खेळत होता, तेव्हापासून मी त्याला पाहतो आहे. टी२० क्रिकेटमध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो हे मला माहिती आहे”, असं हेडन म्हणाला.
हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाक सामन्याचे समालोचन मराठीतून!

केएल राहुल
“लोकेश राहुल शिवाय ऋषभ पंतदेखील दमदार कामगिरी करण्यात निष्णात आहे. कोणत्याही प्रकारचा गोलंदाज असो, पंत त्या गोलंदाजाला थेट मैदानाबाहेर षटकार मारण्याची क्षमता राखतो. त्याच्याकडे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे त्याला जर वेळेवर बाद केलं नाही तर तोदेखील पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेऊ शकतो”, असंही हेडन म्हणाला.
Esakal