नवी दिल्ली ः कोरोना लसीकरणात शंभर कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा गाठणाऱ्या नव्या भारताची नवी प्रतिमा जगासमोर आली आहे. जे लोक संसर्गाच्या काळात अनेक प्रश्न विचारत होते त्यांना १३० कोटी देशवासीयांनी या लसीकरणातूनच उत्तर दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचाही दावा केला. सणासुदीच्या काळात मास्कच्या वापराबरोबरच सर्वांनी आरोग्य नियमांचे पालन करावे, असा सावधगिरीची इशाराही त्यांनी दिला. आपल्या सरकारने लसीकरणावर व्हीआयपी संस्कृतीचे आक्रमण होऊ दिले नाही. उच्चपदस्थ, श्रीमंत यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लस मोफत मिळत आहे. लस भेदभाव करत नाही तर लसीकरणात भेदभाव कशाला? हे सरकारचे सूत्र आहे असे मोदी यांनी सांगितले.

कोरोना काळात १९ महिन्यांत मोदींनी देशवासीयांना उद्देशून केलेले हे दहावे भाषण होते. येत्या रविवारच्या (दि. २४) मन की बात कार्यक्रमात याचे विस्तारित रूप ऐकायला मिळेल असे सांगितले जाते.

हा मोठा विजय

‘कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः​’ या वेदवचनाने आपल्या भाषणाची सुरवात करून मोदी म्हणाले की,‘‘ भारताच्या संदर्भात बोलायचे तर कोरोना काळात देशाने एकीकडे कर्तव्यपालन केले तेव्हा दुसरीकडे त्याला (लसीकरणात) मोठा विजय मिळाला. शंभर कोटी लसीकरणाचे कठीण उद्दिष्ट साध्य झाले कारण यामागे प्रत्येक देशवासीयांची शक्ती उभी होती. हा केवळ एक आकडा नसून हे प्रत्येक नागरिकाचे यश व देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे.’’

हेही वाचा: Pune : नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यु

देशात सणासुदीच्या तोंडावर चारी बाजूंनी उत्साहाचे वातावरण आहे. देशविदेशातील तमाम अर्थसंस्था भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. देशात युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढत आहेत. स्टार्टअपचा विक्रम झाला आहे व गृहबांधणी क्षेत्रातही नवी ऊर्जा दिसत आहे. मागील काळातील सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने अग्रेसर होते आहे असा दावाही पंतप्रधानांनी केला. क्रीडा क्षेत्र असो की मनोरंजन देशात सारीकडे ‘कुशल मंगल” आहे अशी भावना मोदींनी बोलून दाखविली.

मोदी म्हणाले

  • भारताच्या लसीकरणाचे जगभर कौतुक

  • अनेक देशांची भारतीय लशींना पसंती

  • टीकाकारांना नागरिकांनीच उत्तर दिले

  • भारतीयांनी उत्साहाने लस घेतली

  • लसमात्रांचा पुरवठा वैज्ञानिक पद्धतीने

  • कोविन ॲपमुळे सामान्यांना दिलासा

  • कोरोनाविरोधातील युद्ध अद्याप सुरूच

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here