गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी लैंगिक शोषणाबाबत मोकळेपणे व्यक्त होताना दिसले. लैंगिक शोषण हे कोणाचंही, कधीही आणि कुठेही होऊ शकतं आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं किती आवश्यक आहे, विशेषतः मुलांमध्ये.. हे त्यांनी स्पष्ट केलं. दीपिका पदुकोण, कल्की कोचलीन, नीना गुप्ता यांसारखे काही सेलिब्रिटी आहेत जे बालपणी लैंगिक शोषणाला सामोरे गेले आहेत.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला होता की, जेव्हा ती १४-१५ वर्षांची होती तेव्हा तिचे कुटुंबीय आणि ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर रस्त्यावरून चालत होते. तिची बहीण आणि वडील पुढे चालत असताना, ती आईसोबत मागे चालत होती. चालताना एका पुरुषाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. दीपिका त्या व्यक्तीच्या मागे धावत गेली आणि तिने भररस्त्यात कॉलर पकडत त्याच्या कानशिलात लगावली होती. वयाच्या १३ व्या वर्षी विनयभंग झाल्याचा खुलासा अभिनेत्री सोनम कपूरने एका मुलाखतीत केला होता. सोनम तिच्या मित्रांसोबत चित्रपट पहायला गेली होती आणि तिथे एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला. याविषयी सोनम म्हणाली, “मी भीतीने थरथर कापू लागली होती. पण तरीसुद्धा मी थिएटरमध्ये बसून तो चित्रपट पूर्ण पाहिला. मी काहीतरी खूप चुकीचं केलं असेन, म्हणून माझ्यासोबत ती घटना घडली, असा विचार माझ्या मनात सतत येत होते.” फक्त मुलींसोबतच नाही तर मुलांसोबतही लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या घटना घडतात, असं अभिनेता अक्षय कुमार म्हणाला होता. त्याच्या लहानपणी घडलेल्या एका घटनेबद्दल त्याने सांगितलं, “मी सहा वर्षांचा असताना लिफ्टमध्ये एका पुरुषाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. माझ्या वडिलांना मी याबाबत सांगितलं होतं. त्यांनी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. घडलेल्या घटनेबद्दल मी वडिलांना मोकळेपणाने सांगू शकलो, याचं मला समाधान वाटतं.” ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात अभिनेत्री नीना गुप्ता यांनी डॉक्टर आणि टेलरकडून विनयभंग झाल्याचा खुलासा केला. डोळ्यांच्या तपासासाठी डॉक्टरकडे गेली असता त्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना त्यांनी सांगितली. भीतीमुळे याबाबत त्यांनी आईला काहीच सांगितलं नव्हतं. पुन्हा एकदा टेलरकडे अशीच एक घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र तेव्हासुद्धा स्वातंत्र्य गमावण्याच्या भीतीमुळे मौन बाळगणं पसंत केलं, असं त्या म्हणाल्या. अभिनेत्री कल्की कोचलीनसुद्धा तिच्या लहानपणी लैंगिक शोषणाचा सामोरं गेली होती. मात्र या घटनेबाबत अधिक काही बोलण्यास तिने नकार दिला. “ती अशी घटना होती, ज्याच्या कटू आठवणी मी कित्येक वर्षे विसरू शकले नव्हते.”