दहिवडी : धीरगंभीर वातावरणात अतीव दु:खाला आवर घालत विश्वनाथ काटे यांनी आपला थोरला सुपुत्र जवान सचिन काटे (Jawan Sachin Kate) याला मुखाग्नी दिला अन् उपस्थित जनसागराच्या भावनांचा बांध फुटला. जवान सचिन काटे अनंतात विलीन झाला. लाडक्या सुपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता.
जवान काटे याचा राजस्थानमध्ये (Rajasthan) मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी संभूखेड (ता. माण) या गावी पोचताच गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडून गेला. सर्वांचे डोळे सचिनच्या पार्थिवाकडे लागले होते. शुक्रवारी रात्री दोन वाजता पार्थिव संभूखेड या गावी आल्यानंतर कुटुंबीयांसह आप्तेष्टांनी दु:खावेगाने हंबरडा फोडला. आज सकाळी नऊ वाजता सचिन यांचे पार्थिव घरातून शाळेसमोर नेण्यात आले. तिथून सजविलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी अंत्यदर्शनासाठी संभूखेड परिसरातील मोठा जनसमुदाय लोटला होता.
हेही वाचा: सातारा जिल्ह्यातील संभूखेडच्या जवानाचा राजस्थानात मृत्यू

जवान सचिन काटे
अंत्ययात्रेला उपस्थित तरुण वर्ग ‘सचिन काटे, अमर रहे’, तसेच ‘भारतमाता की जय’ असा जयघोष करत होता. सकाळी पावणेदहाच्या सुमारास शंभूमहादेव मंदिराच्या रस्त्यालगत मोकळ्या पटांगणात पार्थिव आणण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सचिनच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. प्रशासनाकडून तहसीलदार सूर्यकांत येवले व सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सचिनचे वडील विश्वनाथ काटे यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला. या वेळी अनेकांना हुंदका आवरणे अशक्य झाले होते. साश्रू नयनांनी सचिनला अंतिम निरोप देण्यात आला.
हेही वाचा: निवडणूक प्रचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला
Esakal