माउंट मंदा, गढवाल हिमालयातील तीन शिखरांचा समूह. अतिशय मनमोहक मात्र चढाईसाठी तेवढाच कठीण. या शिखर समूहापैकी माउंट मंदा-१ हे शिखर सर्वात उंच आहे. ६५१० मीटर उंच असलेल्या या शिखरावर फार क्वचितच गिर्यारोहण मोहिमा आयोजित केल्या जातात. या शिखरावरील चढाई म्हणजे महाकठीण. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच मोहिमा येथे यशस्वी झाल्या आहेत. यात भर पडली ती गिरिप्रेमीच्या नुकत्याच यशस्वी झालेल्या मोहिमेची. सप्टेंबर २०२१ मध्ये गिरिप्रेमीच्या डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हाडोळे या गिर्यारोहकांनी माउंट मंदा-१ या शिखरावर उत्तर रितीने यशस्वी चढाई केली. या शिखरमाथ्यावर चढाईसाठी जे काही मार्ग आहेत, त्यापैकी सर्वात कठीण मार्ग म्हणजे उत्तर धारेचा मार्ग. या मार्गावरून या आधी केवळ एकदाच जपानी गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली आहे, ती देखील १९८२ मध्ये. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय काय, जगातील कोणत्याही गिर्यारोहकाला, गिर्यारोहण संस्थेला माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने चढाई करता आली नव्हती. मात्र, यावेळी गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी हे आव्हान पेलले व अभूतपूर्व यश मिळविले. भारतीय इतिहासातील महत्वाची घटना म्हणून गणल्या जाणाऱ्या या क्षणाचा मी बेस कॅम्पहुन साक्षीदार ठरलो.
माझ्यासाठी माउंट मंदा-१ हे शिखर भावनिकदृष्ट्या खूप जवळचे आहे. याच शिखरामुळे माझ्यातील गिर्यारोहक घडण्यास कलाटणी मिळाली, असे मला वाटते. सुमारे तीस वर्षांपूर्वी, १९८९ मध्ये मी पहिल्यांदा माउंट मंदा-१ मोहिमेसाठी गढवाल हिमालयात दाखल झालो. त्याकाळात देखील माउंट मंदाची ओळख ही भारतीय हिमालयातील अत्यंत अवघड शिखर अशीच होती. तीन दशकांनंतर देखील हीच ओळख कायम आहे. या शिखर मोहिमेसाठी प्रचंड तयारी आवश्यक होती. सोबतीला स्नो- आईस क्राफ्टचे कौशल्य असणे गरजेचे होते. अंगात धाडस असल्याशिवाय माउंट मंदा अशक्यच असे आम्हाला थोरा-मोठ्यांनी सांगितले होते. या मोहिमेच्या आधी तयारीचा भाग म्हणून मी पुण्यातील गिरिभ्रमण संस्थेचे जेष्ठ गिर्यारोहक डॉ. बापूकाका पटवर्धन यांना भेटलो.

गिर्यारोहण मोहिमांची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेली इत्यंभूत माहिती बापूकाकांकडे असे. एखाद्या शिखराचा इतिहास, भूगोल व भविष्य यांवर माहितीपूर्वक भाष्य करू शकणाऱ्या बापूकाकांची भेट घेऊन मी माउंट मंदाविषयी जमेल तेवढी माहिती गोळा केली आणि मोहिमेसाठी निघालो. माझ्यासोबत अजय देवधर, संजय डोईफोडे व सुरेंद्र चव्हाण होते. मी मोहिमेचे नेतृत्व करत होतो. आमच्यासोबत असलेला सुरेंद्र, ज्याला आम्ही S. A. म्हणत असू, त्याची ही हिमालयातील पहिलीच गिर्यारोहण मोहीम होती. याच S. A. ने पुढे १९९८ मध्ये जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करत ‘एव्हरेस्ट शिखर चढाई करणारा पहिला महाराष्ट्रीय नागरिक’ हा बहुमान मिळविला.
आम्ही मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या योजनेप्रमाणे राशन, गिर्यारोहणातील साधन सामग्री घेऊन माउंट मंदाच्या बेस कॅम्पला दाखल झालो. बेस कॅम्पवरूनच शिखराचा आवाका प्रचंड आहे, याची जाणीव झाली होती. आमच्याकडे उपलब्ध साधनांचा वापर करून आम्ही जेव्हा कॅम्प १ ला पोहोचलो, तेव्हा आम्हाला कळून चुकले होते की ही मोहीम इथेच सोडावी लागणार. समोर उभ्या असलेल्या तीव्र धारेवरून चढाई करण्यासाठी आमच्याकडे संसाधनांची कमतरता होती. आमच्याकडे असलेला दोर संपला होता, राशन संपत आले होते आणि गिर्यारोहणाची साधने कमी पडू शकतील, याचा अंदाज येत होता. आम्हाला खूप मोठी शिकवण मिळाली. आमची तयारी कमी पडली. माउंट मंदाने आम्हाला हुलकावणी दिली होती.
या मोहिमेचा अयशस्वीतेचे मुख्य कारण हे अपुरी तयारी होती. एक गिर्यारोहण नेता म्हणून मला हे बोचत होते. काहीही करून माउंट मंदा शिखर चढाई करायचीच, हा निर्धार करून मी परतलो. त्याच दरम्यान माझ्या लग्नाचा विचार घरी चालू होता. मला मात्र इतक्यात काही लग्न करायाचे नव्हते. आधी मंदा शिखर आणि मग लग्न ! अशीच माझी भूमिका होता. त्यामुळे जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे, हे कळाल्यावर काहीतरी कारण काढून मी पळवाट काढली. माझ्या मनात ‘मंदा एके मंदा’ हाच विषय होता. त्यामुळे मोहिमेच्या तयारीचे पहिले पाऊल म्हणून मी तडक दिल्ली गाठली.
येथे असलेल्या ‘इंडियन माउंटनियरिंग फाउंडेशन (आय.एम.एफ)’ या भारतातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संघटनेच्या कार्यालयात भारतीय हिमालयात असलेल्या सर्व शिखरांवर चढाई मोहिमासंदर्भात इत्यंभूत माहिती उपलब्ध असते. मुळात भारतीय हिमालयात गिर्यारोहण मोहीम आयोजित करण्यासाठी ‘आय.एम.एफ’ची परवानगी घ्यावी लागते, तरच शिखर मोहीम करता येते, अन्यथा बेस कॅम्पला देखील जाता येत नाही. आय.एम.एफच्या कार्यालयात गेल्यावर माउंट मंदा-१ शिखर मोहिमांविषयी माहिती काढताना कळाले की १९८२ मध्ये जून महिन्यात जपानी गिर्यारोहकांनी या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. या मोहिमेच्या नेत्याचा संपर्क करण्यासाठी पत्ता आम्हाला आय.एम.एफ.मधून मिळाला. एहिमे विद्यापीठातील संघाने शिखर चढाईची कामगिरी केली होती. त्यांनी उत्तर धारेच्याच मार्गाचा चढाईसाठी अवलंब केला होता. पत्ता मिळाल्यावर विनाविलंब मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला व मोहिमेचा अहवाल पाठविण्याविषयी विनंती केली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार करण्यासाठी भरपूर कालावधी लागत असे.
जपानी नेत्याकडून आम्हाला ताबडतोब उत्तर मिळेल, अशी अपेक्षा कमीच होती. मात्र, अनपेक्षितपणे अगदी कमी वेळेत आम्हाला जपानी संघाच्या माउंट मंदा-१ मोहिमेचा इत्यंभूत अहवाल पोस्टाद्वारे घरपोच मिळाला. आम्ही तो अहवाल बघून सुखावलो. मात्र, अहवाल उघडतातच आमच्या आनंदावर विरजण पडले. कारण, हा अहवाल जपानी भाषेत होता. त्याकाळी सहजासहजी भाषांतर करणारे उपलब्ध होत नसत. त्यात जपानी भाषेतून अनुवाद म्हणजे दिव्यच. यावर उपाय शोधात असताना आमची मैत्रीण अनघा घैसास मदतीला धावून आली. तिच्या ओळखीतील एक बाई जपानी ते इंग्रजी अनुवाद करू शकत होत्या, त्या बाईंचे नाव होते मिचिको एस. तेंडुलकर. मूळच्या जपानी पण त्यावेळी पुण्यात कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या मिचिको यांनी आम्हाला जपानी भाषेतील मोहिमेचा अहवाल इंग्रजी भाषेत विनामूल्य अनुवादित करून दिला व आमच्या मोहिमेतील खूप मोठा अडथळा दूर झाला. आजही तो अहवाल मी जपून ठेवला आहे. त्या अहवालाचा पुरेसा अभ्यास करून, मागच्या वेळी केलेलाच चुकांचा अभ्यास करून आम्ही पुन्हा एकदा मंदा मोहिमेसाठी सज्ज झालो.
(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
Esakal