धायरी/पुणे : जीवघेणा उतार, सुरक्षिततेच्या सुविधांचा अभाव व वेगावरील नियंत्रणाकडे होणारे दुर्लक्ष अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल ते नऱ्हे दरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील तीन दिवसातील भीषण अपघातात चौघांना जीव गमवावा लागला, २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले. वारंवार नागरिकांचे प्राण जाऊनही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन कुचकामी उपायोजना करत आहे. तर दुसरीकडे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे वास्तव आहे.
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर चोवीस तास अवजड वाहतूक असते. त्यामुळे वारजे येथील डुक्कर खिंड ते उंड्री चौक, कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या रस्त्यांवर सातत्याने अपघात होतात. याच रस्त्यावर मागील दहा महिन्यात याच ठिकाणी अपघात घडले असून त्यामध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला.
तीव्र उतारच जीवघेणा
कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार आहे. त्यामुळे खेड शिवापुरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग वाढतो. त्यामुळे अवजड वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटते. काही वाहनचालक उतारावरून वाहने बंद करतात. त्यातच ब्रेक निकामी होऊन वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होतात. तेथील पंक्चर अपघातांना निमंत्रण देत आहे.
अशा उपाययोजना गरजेच्या
-
उताराच्या सुरुवातीला झेब्रा पट्टी, छोटे गतिरोधक असावे
-
झाडांवर, रस्त्यावर रिफ्लेक्टर लावावे मार्गावर पथदिवे असावे
-
नवले पूल ते वारजे पूलादरम्यानचे पंक्चर बंद करावे
-
सेल्फी पॉइंटपासून महामार्गावर जाणारा प्रवेश बंद करावा
-
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हावी. वाहनांचा वेग मोजावा
-
इंजीन बंद करून वाहने चालविण्याचा प्रकार थांबवावा
-
वाहने थांबण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असावी
-
ब्लिंकींग सिग्नल बसवावा नवले पुलापर्यंत रस्त्याची उंची वाढवावी
-
नवले पूल संपल्यावर वडगाव पुलापर्यंत उड्डाणपूल बांधावा
-
जादा वाहतूक पोलिस नियुक्त करावे
तीन दिवसांतील अपघात
-
२१ आॅक्टोबर : नऱ्हे सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, १५ जखमी.
-
२२ आॅक्टोबर : भुमकर चौक ते नवले पुलादरम्यान टॅंकरने टेम्पो ट्रॅव्हलरसह पाच वाहनांना धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू, १३ जखमी.
-
२३ आॅक्टोबर : भुमकर चौक ते नवले पुलादरम्यान टेम्पोने चार वाहनांना उडविले, दोन महिला जखमी.
असे आहेत अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट)
खडी मशीन चौक, कात्रज चौक, माई मंगेशकर हॉस्पिटल (वारजे), मुठा नदी पूल, डुक्कर खिंड, नवीन कात्रज बोगदा, दरी पूल, नवले पूल, भुमकर पूल.
अपघाताची कारणे
-
अतिशय जलद उतरणे
-
महामार्गावर रम्बलर्स, सुरक्षा कठडे नाही
-
सर्रासपणे ओव्हरटेक करण्याचा प्रकार
-
सेल्फी पॉइंटमुळे अपघात
-
सेवा रस्त्यावरुन महामार्गावर येणारी वाहतूक
“महामार्गासाठी लागणारे दिशादर्शक फलक, रोड स्टड लावलेले आहे. कर्व पेंटिंग करण्यात येत आहे. चालकांनी देखील वेगमर्यादेचे पालन केले पाहिजे. वाहतूक पोलिसांनी वेगवान वाहनांवर दंड आकारावेत.”
– सुहास चिटणीस, मुख्य प्रकल्प अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.
“पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून महामार्गासंबंधीच्या सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार महामार्गाचे काम करण्यात येईल. आमच्याकडूनही तांत्रिक सहकार्य करून अपघात रोखण्यासाठी उपययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.”
अमित भाटिया, विभाग प्रमुख, रिलायन्स इन्फ्रा.
“वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. महामार्गासंबंधी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.”
– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे.
“कंपनीत जाण्यासाठी मी दररोज येथे बसची वाट पाहतो. सेल्फी पॉईंटजवळ आल्यानंतर वाहने वेगात एकमेकांना ओव्हरटेक करतात. उतारामुळे अनेकदा वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्त्यावर थांबावे लागते.”
– सूरज भोसले, नोकरदार.
Esakal