पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत पुण्यात नवीन सदनिकांचा पुरवठा ११६ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच विक्रीतदेखील ४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील घरांच्या विक्रीत पुणे हे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआरच्या) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

‘प्रॉप टायगर संस्थे’ने पुण्यासह, मुंबई, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, कोलकता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या आठ प्रमुख शहरांतील निवासी बांधकाम क्षेत्राचा आढावा घेणारा अहवाल सादर केला आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीत पुण्यातील बांधकाम क्षेत्राची स्थिती मांडण्यात आली आहे. निवासी बांधकाम क्षेत्रात जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिसऱ्या तिमाहीत पुण्यात एकूण १० हजार ०१५ नवीन सदनिका निर्माण करण्यात आल्या.

गेल्या वर्षी याच काळात ४ हजार ६३५ नवीन घरे उभारण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत नवीन सदनिकांचा पुरवठा ११६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. एप्रिल ते जून २०२१ या दुसऱ्या तिमाहीत २ हजार ८१० सदनिकांचा पुरवठा झाला होता. गृहकर्जांचे गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर आणि मुद्रांक शुल्कात महिलांना सवलतीसारख्या विविध आकर्षक योजनांमुळे घर खरेदी वाढली आहे, असे अहवालात नमूद आहे.

“गेल्या दहा वर्षांत सर्वांत कमी व्याजदर आणि व्यावसायिकांकडून देण्यात येत असलेल्या सवलतींमुळे घरांची विक्री वाढतच आहे. काही राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्क कमी केला होता. त्याचाही फायदा झाला. देशातील प्रमुख आठ शहरांमधील बांधकाम क्षेत्रात येत्या तिमाहीत आणखी स्थिरता दिसेल.”

– राजन सूद, व्यवसायप्रमुख, प्रॉप टायगर

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here