टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्‍तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना रंगणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर 2007 मध्ये रंगला होता. पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघातील हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पहिल्या आणि अखेरच्या बॉल आउटमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती. याच हंगामातील फायनल ही भारत-पाकिस्तान यांच्यात झाली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानला शह देत पहिली वहिली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. 14 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक संघाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. पण आजही 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारे दोन खेळाडू दोन्ही संघात दिसणार आहेत. दुबईच्या मैदानात भारतीय संघाकडून रोहित शर्मा तर पाकिस्तान संघाकडून शोएब मलिक हे खेळाडू मैदानात उतरल्याचे दिसतील. पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कप खेळणारे हे दोन खेळाडू यंदाच्या स्पर्धेतीही संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील. त्यामुळे दबावाच्या सामन्यात खेळण्याचा तगडा अनुभव असणारे हे दोन खेळाडू आपापल्या संघासाठी कितपत योगदान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: IND vs PAK : टीम इंडियातील हे खेळाडू पाक विरुद्ध पहिल्यांदाच खेळणार

रोहित शर्मा: रोहित शर्माने 2007 च्या टी20 वर्ल्‍ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील क्वार्टर फायनल सामन्यात 50 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली होती. भारताच्या ऐतिहासिक विजयात त्याची ही खेळी महत्त्वाची ठरली होती.

हेही वाचा: IND vs PAK : आफ्रिदीच्या मनात अजूनही टीम इंडियाची ‘दहशत’

शोएब मलिक : 2007 मध्ये शोएब मलिकने श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली होती. एवढेच नाहीतर त्याने ऑस्‍ट्रेलिया विरुद्धच्या लढतीतही नाबाद 52 धावा केल्या होत्या. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही शोएब मलिकच्या नावे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा अनुभव पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here