विक्रमगड (मुंबई): दिवाळी म्हणले दिपोउत्सव, दिव्यांना या सणात महत्त्व आहे. दिप, दिवे, पणत्या आणि आकाश कंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्याने सर्वांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्यता महिला समूह नावाने महिलांचा 45 जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमलेला आहे. दिवस रात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाश कंदील बनवण्यात व्यस्त आहेत.

विविध प्रकारचे हाताने नक्षी काम केलेले 10 प्रकारचे आकाश कंदील बनवले जात आहेत. हे आकाश कंदील मुंबई तसेच इतर भागात विविध प्रकारचे हस्त नक्षी काम केलेला एक आकाश कंदील 300 ते 800 रुपयाला विकला जात आहे. एक आकाश कंदील बनवण्यासाठी एका महिलेला एक दिवस लागतो. आता पर्यंत या गटाने 700 ते 800 आकाश कंदील विकले असून दोन हजार आकाश कंदीलाची मागणी असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच बांबू पासून बनवलेले सुबक हस्त कलेने नक्षी काम केलेले 200 आकाश कंदील अमेरिका येथे पाठवण्यात आल्याचे टेटवाली ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड यांनी माहिती दिली.



मोबाईल व चायनीज खेळण्याच्या दुनियेत रमलेल्या मुलांना पारंपरिक खेळण्याचा पूर्णपणे विसर पडला असून उटावली येथील बांबू पासून वस्तू बनविणाऱ्या कलाकारांनी लाकडी खेळण्यांवर विशेष लक्ष दिले आहे. रेल्वे इंजिन, बदक, गाडी अशा विविध खेळण्यांसोबत पूर्णपणे नैसर्गिक व बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील, फुलदाण्या व अन्य 35 प्रकारच्या वस्तू आपले मन मोहून टाकतात. वस्तू विक्रीतुन लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.


टेटवाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड म्हणाले, बांबू पासून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू या समूहा कडून बनवल्या जात आहे. दिवाळी आल्याने आकाश कंदीला जास्त बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आकाश कंदीलांना खुप मागणी आहे. बांबू पासुन बनवलेल्या 200 आकाश कंदील अमेरिकेत निर्यात करण्यात आले आहेत. तर बांबु पासून बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकेलेच्या सुबक नक्षी काम केलेल्या वस्तू इंग्लड, आस्ट्रेलिया, व इतर देशात मागणी नुसार निर्यात केल्या जातात.
Esakal