पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी महापालिकेची आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जागावाटपासाठी २०१७ च्या निवडणुकीतील द्वितीय क्रमांकाच्या मतांनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या पक्षांनी दावा केल्यास महाविकास आघाडीत पेच निर्माण होऊन जागावाटपाचे गणित बिघडू शकते. त्यामुळे जागा वाटप करताना गेल्या निवडणुकीतील द्वितीय क्रमांकाची मते निर्णायक ठरू शकतात.
महापालिकेची २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली असून, २०१७ च्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग रचनेसाठी केलेले प्रगणक गटांमध्ये (ईबी अर्थात इलेक्शन ब्लॉक) फारसा फरक न करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या सध्य इतकीच १२८ राहणार आहे. त्यामुळे जागांमध्ये अर्थात प्रभागांच्या रचनेत फारसा फरक पडणार नसल्याचे दिसते.
परिणामी, आगामी निवडणूक एकत्र लढल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत पेच निर्माण होऊ शकतो. कारण, २०१७ ची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या पक्षांनी या तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे लढली होती. १२८ पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस ५९, कॉंग्रेस तीन व शिवसेना २४ ठिकाणी द्वितीय क्रमांकावर होते. त्यातील काही जागांवर त्यांचे मित्र पक्षच द्वितीय स्थानावर होते. तर, ७७ जागांवर विजयी झालेला भाजप ३८ जागांवर द्वितीयस्थानी होता. आता आगामी निवडणुकीसाठी कोण? कुठे? दावा करणार याचा अंदाज बांधला जात आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी सुरू असून संभाव्य जागा वाटपाचे गणित मांडले जात आहे.
विजयी पक्ष तिथे द्वितीय क्रमांकाची मते मिळालेले पक्ष
शिवसेना विजयी (जाग 9)
भाजप ६
राष्ट्रवादी ३
(टीप : महाविकास आघाडीत तीन जागा वाटपाबाबत पेच निर्माण होऊ शकतो)
अपक्ष विजयी (जागा ५)
भाजप २
राष्ट्रवादी २
शिवसेना १
(टीप : महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत अपक्षांचा भाजपला पाठिंबा)
मनसे विजयी (जागृत १): राष्ट्रवादी …………… १
(टीप : भाजपचा एका जागेवर बिनविरोध विजय झाला होता, त्यामुळे १२७ जागांसाठी मतदान झाले होते.)
Esakal