दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. आम्ही लहान होतो तेव्हा शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसापासूनच आपण किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र डोक्यात फिरू लागायचं. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.
थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे .पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, “पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तिथुन आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत.
“किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याच ध्येयाच प्रतिक मानल्या जात.दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले.”

किल्ला कसा बनवायचा?
गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पिठ अशा गोष्टी एकत्र करुन एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. हा किल्ला तयार करताना गल्लीत मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते. काही जण हे किल्ला बांधणी करतात. तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. दुसरे दोघं गावातील शिंप्याकडून ध्वज तयार करुन आणतात. काही जण कुंभाराकडून किल्ल्यावर ठेवायला मुर्ती तयार करुन आणतात.
पुढे मग किल्ला बांधणी झाली की, गेरु चुणा वापरुन किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केल्या जातं. मग किल्लावर ध्वज लावले जातात. मुर्ती ठेवल्या जातात. झेंडुच्या झाडाचे तोरण लावले जाते. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते.

हा झाला गावातील किल्ला. पण शहरात असा किल्ला तयार करायला असंख्य अडथळे येतात. शहरात जागेची कमतरता असते. शेण माती दगड कुठुन आणायचे हा प्रश्न असतो. त्यावर पर्याय म्हणून बाजारात ढाचा तयार केलेले लाकडी किल्ले किंवा पीओपीचे तयार किल्ले भेटू लागले आहेत. शहरांत अशा किल्ल्यांची मागणी देखील वाढली आहे. खरं तर अशा रेडिमेड किल्ल्यांत किती मजा असते, असा प्रश्न पडतो. पण लहानमुलांना त्यातून इतिहास कळतो. गडकिल्ल्यांची ओळख होते. यासाठी मग हा पर्याय योग्य आहे. काही न केल्यापेक्षा तयार किल्ला आणून मुलांना त्याचं महत्त्वं त्याचा इतिहास सांगणे.
शहरात आता काही ठिकाणी इतिहासप्रेमी लोक दिवाळीच्या आधीपासूनच तयारीला लागतात. मग भुईकोट किल्ला(सपाटीवरचा किल्ला), जलदुर्ग(पाण्यातला किल्ला), गिरीदुर्ग (डोंगरावरचा किल्ला) यातील एखाद्या किल्ला निवडून त्याची प्रतिकृती तयार करत आहेत. त्यासोबत ते त्या किल्ल्यांच्या सविस्तर माहितीचे फलक सोबत लावतात. आणि मग ते प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले करतात. त्यामुळे किल्ल्यांप्रती प्रेक्षकांच्या मनात आदर निर्माण होतो आणि इतिहास देखील कळतो.

किल्ला आणि लहान मुलं
किल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. टाकाऊ वस्तुचा वापर योग्य पद्धतीने करुन मुले किल्ल्यावर सुबकता आणण्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुले जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा त्यांना त्या किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक आणि बांधकामशास्रांची ओळख होते.
अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात. त्यामुळे त्यांना एकीचे बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्याप्रती आदर निर्माण होतो. किल्ल्यांचं संरक्षण ही ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजवला जातो. आजही परिस्थिती पाहता गडकिल्लांचे संवर्धन ऐतिहासिक वारसांचे जतन ही काळाची गरज झाली आहे.त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला भागातील एखाद्या जुण्या किल्लांची प्रतिकृती दिवाळीत किल्ला तयार करतांना साकारा आणि जुण्या इतिहासला पुन्हा उजाळा देण्यास काम करा.
Esakal