अनेक लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. सवय म्हणण्यापेक्षा घोरण्याची समस्या असते असं म्हणणं जास्त उचित ठरेल. घोरण्याची सवय फक्त घोरणाऱ्यालाच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायक ठरते. नॅशनल स्लीप फाऊंडेशनचा अहवालानुसार दर तीनपैकी एक पुरुष आणि चारपैकी एक महिला दररोज रात्री घोरतात.

घोरण्याच्या समस्येकडे आपण फारसं गांभीर्याने पाहत नाही. पण त्यामागच्या कारणांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचं आहे. लठ्ठपणा किंवा जास्त वजन हे घोरण्याचे प्रमुख कारण आहे. अनियमित श्वासोच्छवासासह घोरणे हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे लक्षण असू शकतं. घोरण्यामागे स्लीप एपनिया हेही कारण असू शकतं. हा एक स्लीप डिसॉर्डर आहे, ज्यामध्ये श्वास वारंवार थांबतो आणि पुन्हा सुरू होतो. परंतु ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधे न वापरता नैसर्गिकरित्या घोरण्यावर उपचार करण्यासाठी खूप उपाय उपलब्ध आहेत.

लठ्ठपणा किंवा जास्त वजन –
वजन वाढल्यानंतर ज्यांचे घोरणे सुरू झालं आहे, अशांनी त्यांचं अतिरिक्त वजन कमी करणे फायदेशीर ठरू शकते. लठ्ठ लोकांना मानेच्या भागात जास्त चरबी असते, त्यामुळे वायुमार्गाचा आकार कमी होतो आणि वायुमार्ग संकुचित होण्याचा धोका वाढतो. अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की, वजन कमी केल्याने घोरण्याची वारंवारता कमी होते आणि घोरण्याची समस्या पूर्णपणे थांबू शकते.
झोपण्याची स्थिती-
जेव्हा लोक त्यांच्या पाठीवर झोपतात, तेव्हा घोरण्याची गती वाढते. जेव्हा एखादी व्यक्ती पाठीवर झोपते तेव्हा वायुमार्गाच्या सभोवतालच्या ऊती गुरुत्वाकर्षणाने खाली खेचल्या जातात, ज्यामुळे तो अरुंद होतो. घोरण्यांवरील संशोधन आणि अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेव्हा ते डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपतात, तेव्हा घोरण्याची तीव्रता आणि वारंवारता लक्षणीय प्रमाणात कमी होते.
श्वसनमार्गातील अडथळा-
श्वसनमार्ग जर व्यवस्थित असेल तर घोरण्याची समस्या कमी होऊ शकते. जेव्हा नाक बंद होते तेव्हा हवा जास्त वेगाने फिरते, ज्यामुळे घोरणे वाढते. गरम तेलाची मालिश किंवा नस्य तेलाचे थेंब नाकातील अडथळे उघडू शकतात. तसेच झोपण्यापूर्वी गरम शॉवर घेणे फायदेशीर ठरू शकते. कारण त्यातील त्यामुळे श्वसनमार्ग उघडतो आणि घोरण्याची शक्यता कमी करतो.
हायड्रेशन-
हायड्रेटेड राहणे केवळ घोरणे टाळण्यासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात निर्जलीकरण होते, तेव्हा नाक आणि टाळ्यामध्ये स्राव चिकट होतो. हे हवेच्या योग्य प्रवाहात अडथळा आणू शकते आणि घोरणं सुरु होऊ शकते. पुरुषांसाठी, दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते, तर महिलांनी दररोज 2-3 लिटर पिण्याची सेवन करणे आवश्यक आहे.
धूम्रपान आणि मद्यपान-
संशोधकांचा असा विश्वास आहे की, ऊर्ध्व श्वसनमार्गातील सूज आणि वायुमार्गात होणाऱ्या जळजळीमुळे हे घोरण्याचं कारण होऊ शकते. याचे परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो पण धूम्रपान सोडल्यास घोरण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते. अल्कोहोल हा आणखी एक पदार्थ आहे, जो वायुमार्गाच्या आसपासच्या स्नायूंना आराम देतो, त्यामुळे मद्यपान करणार्‍यांमध्ये घोरण्याची शक्यता वाढते. म्हणूनच झोपेच्या वेळेपर्यंत मद्यपान न करण्याची शिफारस केली जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here