लाडू शब्द ऐकला तरी आपल्या मनात विचार येतो काहीतरी गोड बातमी आहे. कोणतेही चांगली बातमी सांगताना काहीतरी गोड पदार्थ खातो. मग, तो पदार्थ जर लाडू असेल तर ऐकणारी बातमी अजुनच गोड वाटते! लग्न आणि लाडू यांचा फार घट्ट संबध आहे. लग्नामध्ये बहूतेक ठिकाणी शेव किंवा बुंदीचे लाडू करण्याची पध्दत आहेत. त्यामुळे लग्नाळू मंडळीना लग्नाबद्दल विचारायचे असल्यास लोक, ”यंदा लाडू मिळणार का?” असे सहज विचारतात.
यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली असेल. दिवाळीचा फराळामध्ये बुंदीचा लाडू हा हमखास ठरलेला असतो. चला तर मग जाणून घेऊ या बूंदीच्या लाडवाची रेसिपी….

बुंदीचे लाडू
साहित्य: प्रत्येकी दोन कप बेसन-तूप, दीड कप साखर, वेलची पूड, केशर पूड, बेदाणे, बदाम काप, चिमूटभर केशरी रंग

कृती :
बेसन, केशरी रंग यात पाणी घालून भजीच्या पिठाइतपत घट्ट भिजू द्या, मग कढईत तूप गरम करा. झाऱ्यावर डावभर पीठ टाकून कढईवर आपटा म्हणजे तुपात बुंदी पडतात. मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा. जर स्टीलच्या भोकांच्या चहा गाळणीने बुंदी पाडल्या तर मोतीचुराप्रमाणे बारीक पडतात. बुंदी एका ताटात काढा. दरम्यान साखरेत निम्मे पाणी घालून एक तारीच्या पुढे असा पाक करा. त्यात वेलची, केशर, बेदाणे, बदाम, बुंदी घाला. थोडा वेळ मुरल्यावर लाडू वळा.
(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

Esakal