मार्केट यार्ड : दिवाळीत फराळाच्या वस्तूंना नागरिकांकडून मोठी मागणी असते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत अद्यापही खरेदीची लगबग सुरू झाली नाही. मात्र, घाऊक बाजारात शेंगदाणा, खाद्यतेल, साखर, बेसनपीठ यासह काही वस्तूंच्या भावात गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा फराळ महागच असणार आहे.
किरकोळ बाजारात अजूनही ग्राहकांची अपेक्षित गर्दी सुरू झाली नाही. दिवाळीला लागणाऱ्या वस्तूंच्या भावात गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. येत्या दोन-तीन दिवसांत खरेदीसाठी गर्दी वाढण्याचा अंदाज किराणा दुकानदार उदय चौधरी यांनी व्यक्त केला. खाद्यतेलाचे दर गेल्या काही दिवसांपासून उतरले असेल, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते जास्त असल्याचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे सणांवर मर्यादा आल्या होत्या. यंदा संकट ओसरले आहे. त्यामुळे फराळासाठी आवश्यक असलेले पोहे, भाजकी डाळ, खोबरे, शेंगदाणा, मुरमुरे, भडंग, साखर, रवा, मैदा, आटा, बेसन, लाल तिखट, विविध प्रकारचे मसाले आदी वस्तूंच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने आठवडाभरात खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढेल, असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.
सुक्यामेव्याच्या मागणीत वाढ
दिवाळीनिमित्त अनेक जण एकमेकांना सुक्यामेव्याची भेट देतात. तसेच कार्यालये, कंपन्या, संस्थांकडूनही सुक्यामेव्याला मागणी असते. त्यामुळे बाजारात सध्या सुक्यामेव्याच्या मागणीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, काही वस्तूंच्या भावात यंदा घट झाली असल्याचे व्यापारी शुभम गोयल यांनी सांगितले.
“दिवाळीची खरेदी ग्राहकांकडून अजून सुरू झाली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत पोहा, भाजका पोहा, मुरमुरा यांचे भाव स्थिर आहेत; तर पोहे, बेसन यांच्या भावातही वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बेसनाच्या भावात प्रति क्विंटल २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.”
– राजेश शहा, व्यापारी, मार्केट यार्ड
घाऊक व किरकोळ बाजारातील भाव (रुपयांत)
Esakal