T20 World Cup Super 12 Group Standing : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 च्या लढती 23 आक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. दोन गटात मिळून सहा संघ असून पहिल्या गटातील सर्व 6 संघाचा किमान एक सामना झाला असून दुसऱ्या गटातील नामिबिया स्कॉटलंड विरुद्ध बुधवारी आपला पहिला सामना खेळणार आहे. बुधवारी दोन्ही गटातील एक-एक लढत नियोजित आहे. या लढतीपूर्वी कोणत्या गटात कोणता संघ अव्वल आहे आणि कोणता संघ गेलाय रसातळाला यावर एक नजर…
ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघाचा प्रत्येकी एक-एक सामना झाला आहे. या तिन्ही संघाने विजयी सलामी देत आपल्या खात्यात एक एक गुण जमा केला आहे. नेट रन रेटच्या जोरावर इंग्लंडचा संघ (+3.970) या गटात अव्वलस्थानी असून त्याच्यापाठोपाठ श्रीलंका (+0.583 ) दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया (+0.253) तिसऱ्या स्थानावर आहे.

या गटात असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांनी प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघाला एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला असून एका विजयासह त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. त्यांचे नेट रन रेट +0.179 असे असून ते त्याच्या गटात चौथ्या क्रमांकावर आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ दोन सामन्यातील पराभवासह तळाला आहे. बांगलादेशच्या संघाने एक सामना खेळला असून त्यांनाही यात पराभवाचा सामना करावा लागला असून ते पाचव्या स्थानावर आहेत.
ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानच्या संघाने भारत- न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन विजय नोंदवत 4 गुणासह या गटात अव्वलस्थान गाठले आहे. पाकिस्तानचे नेट रन रेट +0.738 इतके आहे. अफगाणिस्तानच्या संघाने स्कॉटलंडचा 130 धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. 2 गुण आणि +6.500 अशा नेट रन रेटसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबियाने अद्याप एकही सामना न खेळल्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर असून पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ -0.532 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भुषविणारा भारत पाचव्या स्थानावर असून -0.973 त्यांचे नेट रन रेटही मायनसमध्ये आहे. त्याच्यापाठोपाठ स्कॉटलंडचा संघ एका पराभवासह तळाला आहे.

ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील अव्वल दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत. ग्रुप एकमध्ये तगडी फाईट असून ग्रुप 2 मध्ये भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात तगडी फाईट पाहायला मिळू शकते. या गटात पाकिस्तान सलग दोन विजयामुळे सेफ झाल्याचे दिसते.
Esakal