नागपूर : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. आज नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’ समोर आणला असून वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. हा निकाहनामा वानखेडे (Sameer Wankhede Nikahnama) कुटुंबीयांनी खरा असल्याचे सांगितले आहे. पण, समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप कुटुंबीयांनी फेटाळून लावला आहे. आईच्या इच्छेसाठी समीर वानखेडे यांनी निकाहनाम्यावर सही केली होती, असं त्यांनी सांगितलं. पण, वेगळ्या धर्मातील व्यक्ती मुस्लीम धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करत असेल तर निकाहनामा तयार होऊ शकतो का? की त्यासाठी त्या व्यक्तीला धर्मांतरच करावं लागतंय? हेच आज आपण समजून घेणार आहोत.
नवाब मलिकांचा नेमका आरोप काय? –
नवाब मलिक यांनी आज सकाळीच या प्रकरणाशी संबंधित माहिती ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता. त्या निकाहनाम्याचा फोटो देखील त्यांनी समोर आणला होता. या निकाहनाम्यावर समीर वानखेडे यांचं पूर्ण नाव ”समीर दाऊद वानखेडे” असं लिहिण्यात आलं आहे. समीर आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह २००६ मध्ये मुंबईतील अंधेरी परिसरात झाला होता. त्यात मेहेरची रक्कम ३३ हजार रुपये होती, असं म्हटलं आहे.

समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो
दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे वडील आधी ज्ञानदेव वानखेडे होते. ते दलित असताना त्यांनी नोकरी मिळविली. पण, त्यांनी माझगाव येथील मुस्लीम महिलेसोबत लग्न केल्यानंतर ते दाऊद वानखेडे झाले. म्हणजे त्यावेळी वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर केलं होतं का? असा प्रश्न उपस्थित होतो.
समीर वानखेडे खरंच मुस्लीम आहेत काय? –
समीर वानखेडेंच्या निकाहनाम्याबद्दल बोलताना वडील म्हणतात, ”मी एका मुस्लीम मुलीसोबत लग्न केलं होतं. समीर आईचा लाडका होता. त्यामुळे आईच्या म्हणण्यानुसार त्याने मुस्लीम मुलीशी लग्न केलं होतं. एकाच जातीचे असेल तर निकाह ग्राह्य धरला जातो. नाहीतर ते लग्न अवैध ठरविलं जातं. त्यावेळी आईच्या विनंतीवरून समीरने निकाहनामावर सही केली आणि मुस्लीम मुलीशी लग्न केलं. त्यानंतर विशेष विवाह कायद्यानुसार देखील त्याने लग्न केलं. पण, समीर वानखेडे यांनी निकाहनाम्यावर सही केली तर त्यांनी धर्मांतर केलं होतं की ते मुस्लीम होते? हा प्रश्न इथं उपस्थित होतो. कारण, ”निकाहनाम्यावर सही करण्यासाठी दोन्ही व्यक्तींचा धर्म मुस्लीम असावा लागतो”, असं वकील आणि कुराणचा अभ्यास असणारे फिरदोस मिर्झा सांगतात.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे
मुस्लीम गैरमुस्लीसोबत लग्न करत असेल तर ”निकाहनामा” तयार होऊ शकतो का? –
नवाब मलिकांनी समोर आणलेला निकाहनामा कुटुंबीयांनी खरा असल्याचे म्हटले आहे. पण, आईच्या इच्छेसाठी त्यांनी निकाहनाम्यावर सही केली. समीर वानखेडे हे मुस्लीम धर्माचे नाहीत, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. मग, दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती लग्न करत असेल तर निकाहनामा तयार होऊ शकतो का? याबाबत वकील फिरदोस मिर्झा सांगतात, ”कुराणातील सुरा नंबर २, आयत नंबर २२१ अनुसार, मुस्लीम व्यक्ती गैरमुस्लीम व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही. निकाहनामा हा मुस्लीम धर्माच्या निकाहासाठीच असतो. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करायचं असेल तर त्याला इस्लाम कायद्यानुसार परवानगी नाही. धार्मिक विधीसाठी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला इस्लाम परवानगी देत नाही.”
वकील मिर्झा यांच्या म्हणण्यानुसार, निकाहनाम्यासाठी दोन्ही व्यक्ती मुस्लीम धर्माच्या असाव्या लागतात. त्यात कुटुंबीयांनी निकाहनामा खरा असल्याचे सांगितले. त्यामुळे समीर वानखेडे खरंच मुस्लीम धर्माचे आहेत का? हा प्रश्न पडतो.
Esakal