नागपूर : आर्यन खान प्रकरणात (aryan khan drugs case) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांचे पाय खोलात असल्याचे दिसतेय. कारण, महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक वारंवार वानखेडेंवर आरोप करत आहेत. दररोज ते एक-एक पुरावा सादर करून नवनवीन दावे करत आहेत. त्यांनी वानखेडेंचा निकाहनामा आणि जन्माचा दाखला देखील समोर आणला असून ते मुस्लीम असल्याचा दावा मलिक करत आहेत. पण, वानखेडे कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण, या प्रकरणात अजूनही काही असे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर मिळालेले नाहीत. ते प्रश्न कोणते? हेच आपण जाणून घेऊयात.
हेही वाचा: Explainer : ‘निकाहनामा’वर सही करण्यासाठी धर्मांतर करणं गरजेचं असतं?
नवाब मलिक आणि वानखेडे कुटुंबीय यांच्यामध्ये आता वॉर रंगल्याचे चित्र आहे. दररोज नवाब मलिक ट्विटरवरून वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्यानंतर माध्यमांसमोर येऊन देखील आरोपांच्या फैरी झाडत आहेत. तसेच वानखेडे कुटुंबीयांकडून त्यांच्या आरोपांना उत्तर दिले जात आहे. मात्र, हे प्रकरण नेमकं थांबणार कधी? असा प्रश्न पडतोय. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये असे तीन प्रश्न उपस्थित होतात त्याचे उत्तर ना वानखेडे कुटुंबीयांनी दिले, ना नवाब मलिकांनी.
वडिलांचे कागदपत्रं समोर आले, पण समीर वानखेडेंचे का नाही?
नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला होता. त्यावेळी ”समीर दाऊद वानखेडे” इथून फर्जीवाडा सुरू झाला, असा आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंनी तोंडी हे आरोप फेटाळून लावले. मग, त्यांच्या वडिलांचे कागदपत्रं समोर आलीत. त्यामध्ये वडिलांचा जन्माचा दाखला, जातप्रमाणपत्र, वंशावळ आणि कुटुंबातील काही व्यक्तींच्या जात प्रमाणपत्राचा समावेश होता. यामध्ये वडिलांची जात ही अनुसूचित जाती अशी लिहिली आहे. आज देखील त्यांच्या वडिलांनी माध्यमांसमोर येऊन मी अनुसूचित जातीचा असताना, माझा मुलगा मुस्लीम कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला. पण, आरोप हे समीर वानखेडेंवर होत आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंचे कागदपत्रं समोर का येत नाहीत? वानखेडे कुटुंबीय फक्त वडिलांचे कागदपत्रं का दाखवतात? या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही.

समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला
महाविकास आघाडीतील इतर मंत्री गप्प का?
नवाब मलिक आक्रमकपणे समीर वानखेडेंवर आरोप करत असताना महाविकास आघाडीतील इतर मंत्री मात्र गप्प बसले आहेत. समीर वानखेडेंची पोलिस चौकशी करणार म्हटल्यानंतर देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाबद्दल भाष्य केलेलं नाही. तसेच नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी अद्यापही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नेहमी व्यक्त होणारे काँग्रेसचे नाना पटोले या प्रकरणावर सध्या गप्प बसल्याचे दिसतेय. एनसीबीने नवाब मलिकांच्या जावयांवर कारवाई केली होती. माझ्या जावयाकडे ड्रग्स नाहीतर हर्बल तंबाखू सापडला होता, असं नवाब मलिक म्हणाले होते. त्यामुळे नवाब मलिक हे प्रकरण वैयक्तिक लढतात का? की त्यांना महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा आहे? या प्रश्नाचं उत्तर देखील अजून मिळालेलं नाही. कारण, अद्यापही महाविकास आघाडीतील कुठल्याही मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

नवाब मलिकांनी समोर आणलेला वानखेडेंचा निकाहनामा
नवाब मलिक कागदपत्रं सोशल मीडियावर व्हायरल करतात, पण कायदेशीर कारवाईसाठी धाव का घेत नाहीत?
आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानतंर नवाब मलिक अधिकच आक्रमक झाले आहेत. ते दररोज वानखेडेंवर आरोप करत आहेत. तसेच वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविली आहे आणि एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याच्या जागेवर ताबा मिळविला आहे, असा आरोप नवाब मलिक करत आहेत. समीर वानखेडे मुस्लीम आहेत, असा दावा करत ते समीर वानखेडेंचे कागदपत्रं व्हायरल करत आहेत. त्यांनी आतापर्यंत जन्माचा दाखला आणि निकाहनामा समोर आणला आहे. पण, नवाब मलिक फक्त माध्यमं आणि सोशल मीडियावरून बोलत आहेत. प्रत्यक्ष कारवाईसाठी त्यांनी अजूनही धाव घेतलेली नाही. नवाब मलिक न्यायालयात का जात नाहीत? हा प्रश्न देखील इथं अनुत्तरित राहतो.
Esakal