कोरोनाची भिती कमी झाल्याने, निर्बंध कमी झाल्याने यंदा दिवाळीचा सण सगळेच धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. पुढचा अख्खा आठवडा दिवाळीमय होणार असला तरी फक्त चारच दिवस दिवाळी साजरी करता येणार आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी कोणता सण आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवसांना विशेष महत्व आहे. जाणून घेऊया कोणते दिवस कधी येणार आहेत ते.

वसुबारस- यावर्षी सोमवार 1 नोव्हेंबरला रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने त्याच दिवशी ‘ गोवत्स द्वादशी-वसुबारस ‘ आहे. गोवत्सद्वादशीलाच कोकणात वसूबारस असे म्हणतात. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असं म्हणतात.
गुरुद्वादशी- यावर्षी मंगळवार, दि. २ नोव्हेंबर रोजी आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी ‘ गुरुद्वादशी ‘ आहे. गुरुद्वादशी हा श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे.या दिवशी दत्त मंदिरात गुरूद्वादशी निमित्त दीपोत्सव केला जातो.
धनत्रयोदशी-. २ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळी आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने धनत्रयोदशी आहे.या दिवशी काही लोक धन आणि दागिने यांची पूजा करतात.व्यापारी नवीन वर्षाचे हिशोब लिहीण्यासाठी वह्या खरेदी करून पूजा करतात.
हा आहे मुहूर्त- मंगळवार, २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९-३१ ते १०-५६ चल, सकाळी १०-५७ ते दुपारी १२-२१ लाभ, दुपारी १२-२२ ते दुपारी १-४६ अमृत, दुपारी ३-११ ते सायं.स४-३६ शुभ चौघडी वेळेत हिशेबाच्या नवीन वह्या आणाव्यात.
नरक चतुर्दशी- 4 नोव्हेंबर गुरुवारी नरक चतुर्दशी आहे. दिवाळीची पहिली आंघोळ या दिवशी केली जाते. म्हणूनच नरकचतुर्दशी ला विशेष महत्व आहे. या दिवशी चंद्रोदयापासून ( पहाटे ५ – ४९ ) सूर्योदयापर्यंत ( ६-४१ ) अभ्यंगस्नान करावे.
लक्ष्मीपूजन- यावेळी 4 नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन आहे. ज्या दिवशी प्रदोषकाली अश्विन अमावास्या असेल , त्या दिवशी प्रदोष कालात लक्ष्मीपूजन करावे, असे म्हणतात. प्रदोष काळात अश्विन अमावास्या असल्याने 4 तारखेलाच प्रदोष काळात सायं. ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन करावयाचे आहे.
दिवाळी पाडवा- 5 नोव्हेंबरला यावर्षी दिवाळी पाडवा आहे. पती-पत्नीचे नाते वृद्धींगत व्हावे यासाठी पाडवा सणाला विशेष महत्व आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. तसेच या दिवशी बलिप्रतिपदा असल्याने बलीची पूजा केली जाते.
भाऊबीज- 6 नोव्हेंबरला यावर्षी भाऊबीज आहे. बहीण- भावंडांचा दिवस. बहिण भावाला ओवाळते. तसेच आजकाल बहिण- भावंडे मिळून गेट-टूगेदर करतात.
Esakal