दिपाली सुसर
दीपिका देशमुख ही एकेकाळची इतर बायकांसारखी चूल आणि मुल यात गुरफटून काम करणारी गृहिणी. पण, त्यांच्या आयुष्यात अचानक एक वादळ आलं. पती गंभीर आजारी पडले आणि मग पुढे आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मग त्यांनी गावातील महिलांना एकत्र करुन हलव्याच्या दागिन्यापासून ते पापड, कुरडया आणि लोणची विकणं सुरू केलं. कोरोना लॉकडाऊनच्या ऐन कसोटीच्या काळात मार्केटमध्ये उतरुन अनेक संकटांना तोंड देत आपलं एक वेगळं अस्तित्व तयार केलं. आता पुढचा टप्पा म्हणजे पर्यावरणपूरक दिवाळीचे साहित्य तयार करुन त्याचं योग्य मार्केटिंग त्या करत आहेत. मोबाईलमधील युट्यूबचा योग्य वापर लॉकडाऊनच्या काळात करुन त्यांनी आपल्या कलागुणांना समृद्ध केलं. गावातील गरजू गृहिणींना एकत्र आणून सुरू केला सुर्योदय महिला गृह उद्योग.
दीपिका सांगतात, “गावातील इतर महिलांप्रमाणे माझं आयुष्य होतं. धुणं-भांडी यात मी रमायची आणि माझे पती सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करायचे. पण पुढे त्यांना एका आजाराने हेरले आणि त्यांच्या आजारपणामुळे मला आमच्या सायकल दुरुस्तीच्या व्यवसायात पुढाकार घ्यावा लागला.”पण पतीच्या औषधांचा खर्च आणि घरखर्च याला सायकल व्यवसायातून येणारा पैसा अपुरा पडु लागला. तेव्हा मग मी सायकलच्या दुकानात बसुनच लाह्या आणि बत्तासे यापासून दागिने तयार करायला लागले. त्याला चांगली मागणी मिळत गेली आणि मग आत्मविश्वास वाढू लागला. डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या. यातूनच पुढील व्यवसायाला आपोआप चालना मिळत गेली.”

पुढे दीपिका यांनी 2017 मध्ये सूर्योदय बहुउद्देशीय महिला मंडळ या संस्थेची स्थापना केली. त्यातून गृहउद्योग सुरू केला. ग्रामीण भागातील अनेक महिला त्यांच्या गृहउद्योगाशी जुळल्या. त्यातून महिलांना आवड असणाऱ्या कामाकडे लक्ष केंद्रित केलं. त्या सांगतात, “वस्तू तयार करण्यात ज्या महिलांचा हातखंडा असेल, ते काम त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आलं. मग त्यातून कुणी चकल्या, लोणची, पापड्या, कुरवड्या किंवा डोहाळ्यासाठीचे जेवण, ते आम्ही तयार करायला लागलो. आमच्या गृह व्यवसायातून फुलांपासून तयार केलेले दागिने तर असायचेच, पण हळदीपासून तयार केलेले दागिने आमची विशेष ओळख होती. हलव्यापासूनही आम्ही दागिने तयार केले आणि त्याची विक्री आमच्या गृह उद्योगातूनच व्हायची.” पुढे मग कोरोना आला आणि सगळं जग थांबलं. पण दीपिका यांनी मात्र हिंमत सोडली नाही.

“कोरोना काळात आम्ही मास्क तयार करण्याचं काम सुरू केलं आणि ते लक्षवेधी ठरलं. जवळपास दोन लाख मास्कची विक्री आम्ही कोरोना काळात केली. ” नवरात्रीच्या आधी दीपिका देशमुख यांनी गाईच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलं. त्यांच्याकडे राष्ट्रीय कपीला आयोगाचे प्रमाणपत्र असल्यामुळे त्या खात्रीशीरपणे ग्राहकांना माहिती देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 20 महिला या ग्राहकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी काम करत आहेत. त्यामध्ये त्या गाईच्या शेणापासून हवनकुंड, न जळणारे दिवे, चाबीचे किशन, देवघरात लावायचे स्टीकर तसेच दहा प्रकारची धुपबत्ती तयार करतात. दिव्याच्या वातीही तयार करतात. हे सगळं त्या हातांनी तयार करत आहेत. सोबतच दिवाळीचे पारंपरिक फराळ देखील तयार करुन वाजवी दरात त्यांची विक्री करत आहेत. दीपिका पुढे सांगतात, “नवरात्रीपासून त्यांनी पाच हजार दिवे विकले आहेत. आमच्याकडे डिजाईन दिवे, साधे दिवे, रंगीत दिवे या प्रकारचे दिवे तयार केले जातात.” पर्यावरण पुरक शेणाच्या वस्तूला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हा महिलांचा आत्मविश्वास आता वाढला आहे. या उद्योगामुळे आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह तर होतोच आहे, सोबतच गावातील महिला सक्षम होत आहे याच खरं समाधान आहे, असंही त्या सांगतात. सूर्योदय बहुउद्देशीय गृह उद्योगामुळे अनेक महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला, त्यांच्या हाताला काम मिळालं आणि त्या कामाचं चीजही होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Esakal