जयसिंगपूर : पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागात महापुरामुळे शेतकऱ्‍यांना दुबार ऊस लागणी कराव्या लागल्या आहेत. शिवाय शिरोळ तालुक्यातून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागात उसाची रोपांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने उसाची टंचाई निर्माण होत आहे. दुसरीकडे सीमाभागात नवीन कारखाने व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याने वाढवलेली गाळप क्षमता यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासणार आहे. जुलैमध्ये आलेल्या महापुरात कृष्णा खोरेसह उपनद्यामुळे शेतीचे हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात पाचशेहून अधिक रोपवाटिका आहेत. त्यामुळे रोपवाटिकांनाही हजारो टन ऊस लागतो. महापुरातील ऊस शेतकऱ्यांनी काढून नवीन उसाची लागण केली.

सध्या सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऑगस्टमध्ये शिरोळ तालुक्यातील तमदलगे, उदगाव, जयसिंगपूर, जांभळी, नांदणी, शिरोळ, कुरुंदवाड, शिवनाकवाडी या भागांतील रोपवाटिकातून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागांत लाखो रोपांची निर्यात केली आहे. त्यामुळे सध्या महापूर आणि रोपवाटिकेला तुटणाऱ्‍या उसामुळे शेतात पुरेसा ऊस नाही, असे असताना कर्नाटक सीमा भागात चार साखर कारखाने नवीन झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. म्हणजेच या साखर कारखान्यांचा लवकरच हंगाम संपणार आहे. त्यामुळे रोपे व गाळप क्षमता वाढल्याने उसाची कमतरता भासणार आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानची विजयी हॅटट्रिक, अफगाणिस्तानने संधी गमावली!

“शिरोळ तालुक्यात उसाची दर्जेदार रोपे तयार होतात. ८६०३२, ०२६५, ८००५, १८०२४ यासह विविध जातींचे रोपे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागांत निर्यात केली जातात. परराज्यातील शेतकऱ्‍यांना या रोपांच्या लागवडीमुळे उतारा पडत असल्याने परराज्यातील शेतकऱ्‍यांनी शिरोळच्या रोपांना प्राधान्य दिले आहे. महापुरानंतर उसांच्या रोपांची मागणी वाढली आहे.”

-प्रल्हाद पवार, किसान रोपवाटिका जांभळी

“महापुरामुळे शेतकऱ्‍यांना उसाची दुबार लागण करावी लागली. शिवाय परराज्यात रोपांची मागणी असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांनी जो कारखाना चांगला दर देत आहे, त्यांना ऊस द्यावा. कर्नाटकातील कारखान्यांची एफआरपी कमी असून, शेतकऱ्‍यांनी ऊस देण्याची घाई करू नये.”

-सावकर मादनाईक, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here