नांदेड ः सातत्याने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असल्याने सर्वच जिवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला पोहचले आहेत. ऐन दिवाळी सणामध्ये दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आलेला आहे. किराणा, भाजीपाला, धान्य, प्रवास व इतर वस्तू दिवाळीच्या तोंडावर महागल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे.

तेल कंपन्या दररोजच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करत आहे. यामुळे शनिवारी (ता.३०) नांदेड शहरामध्ये पेट्रोल ११६.६५ तर डिझेल १०६.०२ प्रति लिटर याप्रमाणे विक्री झाली. डिझेलचे दर उच्चांकाकडे जात असल्याने सर्वच प्रकारच्या जिवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल दोन रुपये २७ पैसे तर डिझेल दोन रुपये ५१ पैशांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालक ऐन दिवाळीसणामध्ये चांगलेच त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा: तब्बल १२ लाख पदव्या मुंबई विद्यापीठाच्या डिजीलॉकरवर उपलब्ध
दळणवळणासाठी सर्वाधिक वाहनांचा वापर केला जातो. वाहतूक करणारे सर्व ट्रक, टेम्पो, माल वाहतूक गाड्या या डिझेलवर चालतात. डिझेल मालवाहतूक गाड्यांचा मायलेज हा जेमतेम १२ ते १४ किलोमिटर प्रतिलिटर असतो. आता डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने मालवाहतूकही महागली आहे. टाळेबंदीमुळे बरेच दिवस मालवाहतूक बंद होती. त्यामुळे स्थिती गंभीर झालेली हगोती. त्यातआता डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्याने मालवाहतूकीचे दर वाढले आहेत. त्याचा फटका ग्राहकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरांना बसतो आहे. परिणामी ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचे चटके हातावर पोट असलेले कुटुंबिय तसेच सर्वसामान्य कुटुंबियांना बसत आहेत.
घरगुती गॅसचेही दर वधारलेत
पेट्रोल-डिझेल सोबतच घरगुती सिलेंडरचेही दर वधारत चालले आहे. गेल्या दहा महिन्यामध्ये सिलेंडरचे दर २०५ रुपये ५० पैशांनी महागले आहे. सद्यस्थितीत ९२५ रुपये ५० पैसे दराने गॅस सिलेंडर घ्यावे लागत आहे. तसेच डिलेव्हरी चार्ज २५ रुपये असे एकूण ९५० रुपये एका गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागत आहे.
Esakal