आपल्या व्हायोलिन वादनानं श्रोत्यांना निखळ आनंद देणाऱ्या प्रभाकर जोग यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गाणारं व्हायोलिन या कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी व्हायोलिनच्या अवीट सुरांचा गो़डवा श्रोत्यांना दिला. त्यांच्या जाण्यानं मराठी संगीत विश्वाची मोठा हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी, हिंदी क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोग यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या राहत्या घरी चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. मराठी आणि हिंदी क्षेत्रातील मोठमोठ्या संगीतकारांशी त्यांचा संवाद होता. त्यांच्याशी ऋणानुबंध होते. ते त्यांनी अखेरपर्यत जपले. त्यांच्या व्हायोलिन वादनानं केवळ भारतातीलच नाही जर जगभरात असलेले मराठी संगीतप्रेमी जोडले गेले होते. त्यांच्या संगीत साधनेविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी सुरुवातीला गजानन राव जोशी आणि नारायणराव मारुलीकर यांच्याकडून गायन आणि संगीताचे धडे गिरवले. जोगकाका म्हणून लोकप्रिय झालेल्या प्रभाकर जोग यांना त्यांच्या बंधुंकडून देखील व्हायोलिन वादनाचे मार्गदर्शन मिळाले.

जोग यांच्या संगीत क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार ग.दि.माडगुळकर रचित गीतरामायणाच्या 500 कार्यक्रमांना व्हायोलिनची साथ संगत केली होती. त्यांनी या कार्यक्रमांना साथ देण्याचा किस्सा ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी सांगितला होता. एका महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये बाबुजींनी जोग यांचे व्हायोलिन वादन ऐकले. आणि त्यांनी पुढे आपल्या गीत रामायण या कार्यक्रमामध्ये जोग काकांना संधी दिली होती.

हेही वाचा: बॉलीवूडमध्ये घडलं असं की, त्या अभिनेत्यानं ढाब्यावर केलं काम
जोग काकांनी गाणारं व्हायोलिन म्हणून एक कार्यक्रम सादर केला होता. त्यातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. जोग यांच्या निधनानंतर त्यांना वेगवेगळ्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोग यांना श्रद्धांजली वाहताना जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे . असे म्हटले आहे.
Esakal