India vs New Zealand, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोघांचाही या स्पर्धेतील १-१ सामना खेळून झाला असून दोघांना पाकिस्तानने पराभूत केले. त्यामुळे आता भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सामना एका अर्थाने उपांत्यपूर्व फेरीचा सामनाच मानला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून तयारी केली आहे. या दरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने दिलेल्या एका वॉर्निंगला भारतीय कर्णधार विराट कोहली याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

ट्रेंट बोल्ट
“भारतीय संघाविरूद्ध खेळताना पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने प्रभावी मारा केला. एक डावखुरा गोलंदाज म्हणून त्याची गोलंदाजी पाहून मला फारच आनंद झाला. मी त्याने टाकलेली गोलंदाजी नीट पाहिली. माझ्या गोलंदाजीला गती आणि स्विंग दोन्हीही आहे. त्यामुळे मला अशी खात्री आहे की जे त्या दिवशीच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने केलं, त्याचप्रकारची कामगिरी मीदेखील भारताविरोधात करेन”, अशी एक वॉर्निंग ट्रेंट बोल्टने दिली.

विराट-कोहली
“आम्ही प्रतिभावान गोलंंदाजी असलेल्या संघाविरोधात मैदानात उतरणार आहोत. मैदान, पिच किंवा चेंडूची उसळी कशी असेल यावर आमची खेळातील मानसिकता ठरेल. जर ट्रेंट बोल्ट म्हणत असेल की तो पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीसारखी गोलंदाजी करण्याची इच्छा राखतो. तर मग आम्ही देखील त्याच्यासारख्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आम्ही न्यूझीलंडविरूद्ध आधीही खेळलो आहोत. त्यामुळे त्यांच्या माऱ्याला कसं उत्तर द्यायचं हे आम्ही जाणतो”, असं सडेतोड उत्तर विराटने दिलं.
Esakal