‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून प्रख्यात असलेले संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक प्रभाकर गणेशपंत जोग (वय ८८ वर्षे) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
जोग यांच्यावर गेले महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांना कोथरूडमधील घरी आणण्यात आले होते. रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. समारे सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. व्हायोलिन वादन आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्य सरकारचा लता मंगेशकर, ‘सूरसिंगार’, पुणे भारत गायन समाजाचा वसुंधरा पंडित, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रकर्मी’ पुरस्कार, गदिमा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जात असे. `स्वर आले जुळूनी’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे. संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबरही काम केले. १९५२ मध्ये प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. ‘गाणारे व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हिसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या.