दिपाली सुसर

माझ्या आजीला जर आम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं असेल, तर ती म्हण म्हणून कमी शब्दांत खूप काही सांगुन टाकते. अशीच एक म्हण ती घराच्या अंगणाविषयी सांगते.

‘घराची कळा अंगण सांगे’ याचा अर्थ असा की, तुमच्या घराच्या अंगणावरुन तुमच्या घराची पारख होते. हे अंगण सुशोभित करण्यासाठी मी, तुम्ही, आपल्या सारख्या असंख्य बायका दररोज दारासमोर सडा-सारवण करुन अंगणात रांगोळी काढतात. तिचा आकार कधी मोठा तर कधी लहान असतो. पण ही रांगोळी संकल्पना आहे? चला तर मग आज जाणून घेऊया.

रांगोळी आणि परंपरा

रांगोळीची कला ही मूर्तिकला, चित्रकला या कलांपेक्षा प्राचीन कला आहे. सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादि जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक घरी दारासमोर सडा-सारवण करून रांगोळी काढली जाते. रांगोळीचे पीठ सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ते सहजपणे सुटते. जमीन सारवल्यावर तिच्यावर न विसरता रांगोळीच्या चार तरी रेघा काढतातच, अन्यथा ती जमीन अशुभ समजतात. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिध्दी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

महत्व आकृत्यांचे

रांगोळीत ज्या आकृत्या काढल्या जातात, त्या प्रतिकात्मक असतात. वक्ररेषा, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध प्रतिकात्मक आकृत्या निर्माण करता येतात. कमळ, शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य, नाग, कलश, त्रिदल, अष्टदल ही काही प्रतिके आहेत. रांगोळीचे आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन भेद आहेत. आकृतीप्रधान रांगोळीत रेखा, कोन, वर्तुळ प्रमाणबद्ध करून रांगोळी काढतात. राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर भारत या प्रदेशांत आकृतीप्रधान रांगोळी काढण्याची प्रथा आहे. वल्लरीप्रधान रांगोळीमध्ये फुल, पाने, नैसर्गिक गोष्टीचे आकार, पशु, पक्षी यांना प्राधान्य असते. ही रांगोळी भारताच्या पूर्व भागात प्रचलित आहे. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया तरबेज आहेत. ही रांगोळी आकृतीप्रधान रांगोळीपेक्षा अधिक मोहक वाटते. हिंदू, जैन, पारशी या धर्मांत रांगोळी रेखाटन शुभप्रद मानलेले आहे. उंब-यावर काढलेली रांगोळी अशुभ शक्ती घरात येऊ देत नाही व शुभ शक्तींना घराबाहेर पडण्यास अडथळा आणते अशी समजूत आहे. अंगणातील रांगोळी अंगण सुशोभित करून, येणा-या पाहुण्यांचे स्वागत करून मन प्रसन्न करते.

थोडक्यात काय तर रांगोळी म्हणजे आकारांना जोडून एक रेखीव कलाकृती जमिनीवर तयार करणे. जमिनीला सजवण्यासाठी एखादया भुकटीचा वापर करुन चित्राकृती काढण्याला रांगोळी असे म्हणतात. त्यात रंग भरून ती अधिक आकर्षक बनवली जाते. भारतात रांगोळीला धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्टया फार महत्त्व आहे.

हेही वाचा: Diwali Festival 2021 : सणांवेळी दारासमोर रांगोळी का काढतात? जाणून घ्या…

रांगोळीचा उगम

अनेक भारतीय कलांप्रमाणेच रांगोळीचे नातेही प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे. ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे दिसते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते. रांगोळी जशी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते तशी ती प्राचीन भारतीय तत्वचिंतन आणि लोकधारणा यांचाही वारसा सांगते. रांगोळी काढायला लागणा-या वस्तू सहज व सर्वांना उपलब्ध होणा-या आहेत आणि रांगोळी काढणे फारसे अवघडही नाही. प्राचीन काळी चित्रकलेची सुरुवात झाली ती रांगोळीपासूनच झाली असावी. म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी रांगोळीची निर्मिती झाली असावी असे काही इतिहासकार सांगतात. पुढे रांगोळीचं महत्त्व वाढत गेलं आणि तिने घराघरात हक्काचं स्थान मिळवले. पुढे हीच रांगोळी मांगल्याचे प्रतीक, पावित्र्य अन प्रसन्नतेची खूण झाली.

प्रत्येक जातीतील माणूस रांगोळीला आपलंसं करु लागला मग तिच्या अस्तित्वाला अर्थ आला, तिच्या प्रगटीकरणाला वेगवेगळे आकार फुटले आणि तिच्या रुपाला विविध अंगे प्राप्त झाले.

महाराष्ट्रातील रांगोळीचे प्रकार

ठिबके जोडून रांगोळी काढण्याची प्रथा आहे. परंतु स्वस्तिक, चंद्र, सूर्य, लक्ष्मीची पावले, कमळ पुष्प, महिरप वगैरे आकृती मुक्तहस्त चित्राप्रमाणे काढली जातात. सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू टाकण्याची प्रथा आजही गावाकडे पाळली जाते.

जागेअभावी व वेळेअभावी शहरवासियांना ते रोज शक्य नसले तरी सणावाराला, महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी मात्र रांगोळीशिवाय अजूनही कुणाचे पान हलत नाही.

गौरी-गणपती आणि दिवाळी या दोन सणांना रांगोळीला जास्त महत्त्व आहे. सण जवळ आले की हळदीपासून बनवलेले अत्यंत आकर्षक असे रंग बाजारात विक्रीस येतात. या रंगांनी पांढरी रांगोळी अधिक आकर्षक बनते. याशिवाय रांगोळीच्या सहाय्याने नेत्यांची, देवतांची, सिनेमा तारकांची व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे वगैरेही काढण्याची कला जोपासली गेली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या मिरवणुकींच्या, पंढरपूरच्या वारीच्या वेळी हजारो कलाकारांच्या सहाय्याने काही मैल लांबीच्या रांगोळया ही संस्कारभारतीची खासियत झाली आहे.

विविधतेने नटलेल्या भारत देशात भिन्न भिन्न प्रांतात रांगोळीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि वेगवेगळी माध्यमे वापरली जातात. पण प्रांत बदलला की पद्धत, माध्यम सगळं बदलतं.

काही ठिकाणी रेखाटनासाठी तांदुळाची पिठी, शिरगोळयाचे किंवा संगमरवराचे चूर्ण, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पाने, विविध धान्ये अशी अनेकविध माध्यमे वापरली जातात. गंधरूपात हाताच्या ठशांनी रांगोळीचे सहाय्याने रेखाटन होत असल्याचेही आढळते. पण रेखाटनासाठी स्थाने मात्र सर्वत्र सारखी. धार्मिक, सांस्कृतिक समारंभ प्रसंगी, शुभकार्य प्रसंगी रांगोळी रेखाटली जाते. रांगोळीचे बिंदूप्रधान, आकृतिप्रधान, व्यक्तिप्रधान, प्रकृतिप्रधान असे विविध प्रकार सांगता येतील. परंतु आशय संपन्न प्रतिकांतून भावनांची व विचारांची सौंदर्यपूर्ण रेखीव अभिव्यक्ती करणे हाच रांगोळीचा मुख्य हेतू असतो.

रांगोळीची विशालता

रांगोळीच्या कलाविष्कारात प्रतिकांना आकृतीरूप मिळाले की आकृत्या प्रतिकरूप बनल्या हे सांगणे कठीण आहे. रांगोळीच्या आकृतीतील एकेक प्रतीक ही एक स्वयंपूर्ण रांगोळी बनू शकते, तसेच काही प्रतिकाकृतींच्या सुरेख मांडणीतून रांगोळी कलाकार मोठ-मोठ्या रांगोळी साकारतांना आपल्याला दिसून येतात.

शहरांमध्ये तर आता रांगोळी काढून देणारे अनेक कलाकार आपल्याला आजुबाजूला असतात. त्यांना तुम्ही योग्य मोबदला दिला तर ते सणासुदीला तुम्हाला जशी हवी तशी रांगोळी काढून देतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here