नाशिक : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan) सोशल मीडियाद्वारे (Social media) जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भुजबळ नॉलेज सिटीचा परिसर सुसज्ज असल्यामुळे कमी वेळात संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे संमेलनाबाबतच्या सर्व संकल्पना, सूचना अमलात आणा, असे आवाहन समन्वयक समीर भुजबळ यांनी केले.
संमेलन स्थळ कविवर्य कुसमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे रविवारी (ता. ३१) ४० समित्यांचे प्रमुख व उपप्रमुखांची बैठक झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, की ‘मेट’मधील कर्मचारी, विद्यार्थ्यांना उत्सव व्यवस्थापन करण्याची सवय आहे. त्याचा संमेलनाला लाभ होईल.

संमेलनात कुठे काय आहे साहित्य रसिकांना याबाबत माहिती हवी यासाठी भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेला संमेलनस्थळाचा नकाशा.
हेही वाचा: मोबाईलला रेंज, पण रस्ता नाही; कोशिनपाना येथील आदिवासींच्या व्यथा
नकाशा प्रसिद्ध
या बैठकीनंतर सर्व समिती प्रमुखांनी संमेलनस्थळाची पाहणी केली. आयडिया कॉलेजचे दिनेश जातेगावकर यांनी कॅम्पसमधील कुठे काय होणार आहे, याविषयी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. कॅम्पस्मधील वीसहून अधिक जागांची माहिती देण्यात आली. संमेलनातील मुख्य समारंभ, कविकट्टा, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, संमेलन ध्वज, बालकट्टा, अतिमहत्त्वाच्या अतिथींसाठी व्यवस्था, ग्रंथप्रदर्शन, जेवण व्यवस्था, मीडिया हाउस, गझल गायन, अभिजात मराठी, पार्किंग आदी स्थळांचा नकाशा समितीप्रमुखांना दाखविण्यात आला. यात सूचनेनुसार बदल होतील, असे संयोजकांनी सांगितले. तसेच, संमेलनात तीन दिवस विविध उपक्रम कोणत्या ठिकाणी आहेत, याविषयीची माहिती रसिकांना व्हिडिओद्वारे (वॉक थ्रू) उपलब्ध होणार आहे. शॉर्ट फिल्म, एकपात्री प्रयोग, आर्ट आदी कार्यक्रम ठेवल्यास नाशिकमधील कलाकारांचे कलागुण दिसतील, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी मांडली.

दिपक चांदेंनी संमेलनासाठी दिलेला धनादेश स्विकारताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासह पदाधिकारी.
दीपक चांदेंकडून २५ लाखांची मदत
बांधकाम व्यावसायिक दीपक चांदे यांनी साहित्य परंपरेत आपलेही योगदान असावे, यासाठी २५ लाखांची मदत संमेलनाला देऊ केली आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे त्यांनी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, निधी संकलन समितीप्रमुख रामेश्वर कंलत्री, सदस्य नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटील, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर आदी उपस्थित होते. त्यांनी २ व ४ डिसेंबरला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा, शहरात उभारण्यात येणाऱ्या कमानींचा आर्थिक भार उचलला असून, त्यांच्या हॉटेलमधील दहा रूम पाहुण्यांसाठी विनामूल्य देण्यात येणार आहेत.
हेही वाचा: Nashik : फटाके विक्रेत्यांचा जीव धोक्यात
प्रा. मिलिंद जोशी यांनीही काही सूचना केल्या. एमईटी संमेलन समन्वयक शेफाली भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सहकार्याध्यक्ष मुंकुंद कुलकर्णी, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.
Esakal