अमृता फडणवीस यांनी 2018 साली रिव्हर अँथम नावाने एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश होता. टी सिरीजने प्रोडक्शन केलेल्या या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत या व्हिडीओचा उल्लेख केल्यानंतर सर्वांनी भुवया उंचावल्या. या व्हिडीओच्या बायोमध्ये म्हणजेच व्हिडीओच्या अतिरिक्त माहितीत काही नावांचा उल्लेख आहे. व्हिडीओ निर्मात्या टीममधील सर्व कलाकारांची नावं यामध्ये लिहिण्यात आली आहेत. मात्र, मलिक यांनी अमृता फडणवीसांवर आरोप करत त्यांच्या व्हिडीओतील बायोमध्ये जयदीप राणा नावाच्या ड्रग्ज पेडलरचा समावेश आहे, असं म्हटलं. मलिक यांनी त्यांच्या फेसबूकवर याची माहिती दिली आहे. याचसोबत ट्वीट देखील केलं.

ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याच्यासोबत फडणवीस कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. फडणवीस यांनी ड्रग्ज पेडलर्सला आश्रय दिला असून यासंदर्भात सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राणा सध्या साबरमती तुरुंगात आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याच्यावर कारवाई झालीय. अमृता फडणवीसांनी केलेल्या व्हिडीओला राणाने पैसे पुरवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
सध्या फडणवीस आणि राणा एकत्र असल्याचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत. दरम्यान, नवाब मलिकांनी ही फोटो शेअर केल्यानंतर हे नाव हटवण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर, मलिक यांनी टाकलेला फोटो फॅब्रिकेटेड, म्हणजेच खोटा असल्याचं भाजपने म्हटलंय. या फोटोसोबत छेडछाड झाल्याचंही काही जणांचं मत आहे.
Esakal