नाशिक : महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडीची चाहूल लागताच परदेशी ‘पाहुण्यां’चे आगमन सुरू झाले आहे. अलास्कामधून नऊ हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करून सोनचिखल्या पक्षी इथे दाखल झाले आहेत. वन विभागाच्या पक्षीगणनेत सोनचिखल्या आढळून आला. अभयारण्याच्या परिसरात गाळपेऱ्यांमध्ये किलबिलाट वाढला असून, शेतांमध्ये दाणे खाण्यासाठी पक्षी गर्दी करताहेत.

सोनचिखल्याला इंग्रजीमध्ये ‘पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर’ असे संबोधले जाते. आपल्याकडे ‘सोनटिटवी’ म्हणूनही या पक्ष्याला ओळखले जाते. हा पक्षी रोज किमान दोन हजार किलोमीटरचा प्रवास करतो.
हिवाळ्यात नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये परदेशाच्या जोडीला देशी पक्ष्यांचे आगमन होत असते. अडीचशेहून अधिक जातीचे पक्षी इथे पाहायला मिळतात.
नांदूरमध्यमेश्वर वनस्पती अभयारण्यात पक्षीगणना झाली. या गणनेत १६ हजार ६१३ पक्ष्यांची नोंद झाली. त्यात १३ हजार ५६७ पाणपक्षी, तर तीन हजार ४६ झाडांवरील पक्ष्यांचा समावेश आहे.
गुलाबी मैना, कॉमन क्रेन, रंगीत करकोचा यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पक्षीगणनेत चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, युरीशियान विजन, कॉमन टील, जांभळी पानकोंबडी, रंगीत करकोचा, सूर्यपक्षी, दयाळ, कोतवाल, गप्पीदास, वेडा राघू, मुनिया, डव, हुदहुद, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, नाचण आदी पक्ष्यांबरोबर ओस्प्रे, मार्श हेरीअर हे शिकारी पक्षीही आढळले.
पक्षीगणनेत सहायक वनसंरक्षक विकास अहिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक आशा वानखेडे, डी. डी. फाफाळे, पक्षीमित्र किशोर वडनेरे, अनंत सरोदे, गाईड अमोल दराडे, शंकर लोखंडे, गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, ओमकार चव्हाण, विकास गारे, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, रमेश भराडे, अजय पावडे आदी सहभागी झाले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here