दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणार्या संपत्तीला ‘ लक्ष्मी ‘ असे म्हणतात.भ्रष्टाचार , अनीतीने मिळविलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! आज प्रदोषकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. प्रथम ‘ प्रदोषकाळ ‘ म्हणजे काय ते पाहूया. रात्रीमानाचे पंधरा भाग केले तर एका भागाला ‘ मुहूर्त ‘ म्हणतात. सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ‘ प्रदोषकाल ‘ मानला जातो. यावर्षी आज गुरुवारी सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असते.व्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ‘ श्री ‘ अक्षर लिहून वहीचे पूजन करतात.

दिवाळी

कुबेराची पूजा- महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला आहे. मात्र अथर्ववेदात कुबेराचा वैश्रवण असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य; पुलस्त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे म्हटले आहे. म्हणून कुबेराला वैश्रवण असे नाव मिळाले. कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले व त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर कुबेराने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णतटमंडित लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच तो राज्य करू लागला. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणाने कुबेराचे सर्व हिरावून घेतले. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी-कुबेर पूजनाच्यावेळी लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा व प्रार्थना करतात.
अलक्ष्मी निसारन- अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची देवता मानली जाते. हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असावे आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठी आज तिचेही पूजन करून तिला गावाबाहेर नेऊन विसर्जित केली जाते. समुद्र मंथनातून कालकूट नंतर परंतु लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली. म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण समजले जाते. तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. हिच्या शरीरावर म्हातारपणीच्या खुणा होत्या. समुद्रमंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने देवांना विचारले ” मी कुठे राहू ?” त्यावर देव म्हणाले –” जिथे केस, कचरा, कलह, अनीती भ्रष्टाचार , असत्य भाषण ,सज्जनांची निंदा ,परद्रव्यहरण, आळस, व्यभिचार असेल तेथे तू रहा. ” अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात. लक्ष्मी-अलक्ष्मीसंबंधी एक कथा आहे.
एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघीही एका ऋषींकडे गेल्या. त्या दोघीवी ऋषींना विचारले —
” मुनीवर्य , आमच्या दोघींपैकी सुंदर कोण दिसतेय् ? आणि पहाणार्याला आनंद वाटतोय् ? “
ऋषीना या दोघींपैकी कुणालाच नाराज करावयाचे नव्हते. ते म्हणाले ” तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या. मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.” दोघीही पळत पळत झाडाला हात लावून परत ऋषींकडे आल्या. ऋषी म्हणाले, ” अलक्ष्मी तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस. लक्ष्मी तू इथे येत होतीस त्यावेळी सुंदर दिसत होतीस.” दोघींचे समाधान झाले. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते त्यावेळी आपणास आनंद होते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते त्यावेळी आपणास आनंद वाटतो. सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जावो आणि घरात लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहो यासाठी सर्वाना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !
Esakal