अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा Raj Kundra याने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राजने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट केले आहेत. जुलै महिन्यात त्याला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक झाली होती. सप्टेंबर महिन्यात जामिनावर त्याची सुटका झाली. जामिनावर सुटल्यानंतर राजने माध्यमांसमोर येणं किंवा सोशल मीडियावर व्यक्त होणं टाळलं आहे. आता त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट्स डिलिट केल्याचं समजतंय.
पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक होईपर्यंत राज इन्स्टाग्रामवर सक्रिय होता. शिल्पासोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ तो त्यावर पोस्ट करत होता. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणी कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात पोलिसांनी १४६७ पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यात शिल्पाच्या नावाचा समावेश साक्षीदारांच्या यादीत करण्यात आला होता.
राजच्या अटकेनंतर शिल्पासुद्धा सोशल मीडियापासून बरेच दिवस दूर होती. मात्र काही काळ ब्रेक घेतल्यानंतर ती कामावर आणि सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली. मात्र कुठल्याही पोस्टमध्ये तिने राजचा उल्लेख किंवा त्याचा फोटो टाळला आहे. मी कामात व्यग्र असल्याने पती राज कुंद्रा नक्की काय काम करत होता, याबाबत काही माहीत नसल्याचा जबाब शिल्पाने दिला होता. ‘मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करू. पण मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलांखातर तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कोणाचाही विश्वासघात केला नाही,’ असं शिल्पाने एका पोस्टमधून स्पष्ट केलं होतं.

जामिनावर सुटल्यानंतर राज हा शिल्पासोबत कधीच दिसला नाही. शिल्पा तिच्या कुटुंबीयांसोबत वैष्णोदेवी दर्शनाला आणि त्यानंतर अलिबागला फिरायला गेली होती. करवा चौथनिमित्तही तिने स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. पण या सर्व फोटोंमध्ये राज कुंद्रा कुठेच दिसला नाही.
Esakal