IND vs NZ, T20 World Cup 2021: कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील सलग दुसरा सामना हारला. पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून सहज हरवले. भारतीय संघाने २० षटकात ११० धावा केल्या आणि न्यूझीलंडने हे आव्हान १४.३ षटकात सहज पार केले. भारताच्या संघावर पराभवानंतर बरीच टीका झाली. आणखी महत्त्वाचे म्हणजे, या सामन्यानंतर पत्रकार परिषदेला विराट कोहलीच्या जागी जसप्रीत बुमराह उपस्थित होता. त्यावरून माजी कर्णधार अझरूद्दीन याने मुख्य कोच रवी शास्त्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

रवी शास्त्री
हेही वाचा: IND vs NZ: तर रोहितची हालत पाकिस्तानच्या मॅचसारखीच झाली असती!
“मला असं वाटतं की रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहायला हवं होतं. जर विराट कोहलीला पत्रकारांना तोंड देणं जमत नसेल तर त्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रींनी हजर राहायला हवं होतं. जसप्रीत बुमराहला पाठवणं योग्य नाही. फक्त सामने जिंकल्यानंतरच पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जायचं असं नेहमी होणार नाही. विजय साजरा करताना पत्रकार परिषद घेत असाल तर पराभवानंतरही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जायची तयारी ठेवा. विजय असो किंवा पराजय असो; कर्णधार, कोच किंवा कोचिंग स्टाफमधील कोणीतरी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत उपस्थित राहायला हवं”, असं रोखठोक मत अझरूद्दीनने मांडलं.

मोहम्मद अझरुद्दीन
हेही वाचा: IND vs NZ मॅचआधी तडकाफडकी गॉफ यांना पंचांच्या यादीतून हटवलं!
“जर तुम्ही एखाद-दुसरा सामना हरला असाल तर त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. पण आपला संघ का हरला याचं उत्तर कोच किंवा कर्णधारानेच देशातील चाहत्यांना दिलं पाहिजे. बुमराहसारखा युवा गोलंदाज सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं कशी काय देऊ शकेल? जर सामना जिंकल्यानंतर तुम्ही पत्रकार परिषदेत येऊन प्रश्नांची उत्तर देता तर मग पराभव झाल्यानंतर तुम्ही पत्रकारांना सामोरं जायलाच हवं”, असं अझरूद्दीन म्हणाला.
Esakal