पुणे : गेल्या महिन्यात शंभरी ओलांडल्यानंतरही डिझेल दरवाढीची घोडदौड अद्यापही सुरू आहे. शंभर रुपये प्रतिलिटरचा आकडा ओलांडल्यानंतर किंमत स्थिर होईल, अशी वाहतूकदारांना आस होती. मात्र, त्यानंतरही डिझेलची किंमत स्थिरावलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात डिझेलचे दर ८.५८ रुपयांनी वाढले आहेत, तर साधे व पॉवर पेट्रोल प्रत्येकी ७.०५ रुपयांनी महागले आहे.
हेही वाचा: Corona Vaccine : पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्योग-व्यवसाय आणि नोकरदारांच्या नोकऱ्या सुरळीत होत आहेत. कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटका सर्व सुरळीत झाल्यानंतर भरून काढता येईल, असे प्रयत्न नागरिकांचे सुरू आहेत. पण, त्याला वाढत्या इंधन दरवाढीसह महागाईने सुरुंग लावला आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तू व सेवांच्या किमती वाढल्याने त्याचा एकूण परिणाम दैनंदिन खर्चांवर होत असल्याचे दिसते. १७ जुलै ते २४ ऑगस्टदरम्यान एकदाही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नव्हते. विशेष म्हणजे त्या काळात चार वेळा दर काही पैशांनी कमी झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा सातत्याने दरवाढ सुरू आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली, तर या महिनाअखेर पेट्रोल १२०, पॉवर पेट्रोल १२५, डिझेल ११० रुपये प्रतिलिटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: अजित पवारांच्या कोणत्याही संपत्तीवर टाच नाही; वकिलांचं स्पष्टीकरण
‘सीएनजी’ची सर्वाधिक दरवाढ
पेट्रोल आणि डिझेलसह आता सीएनजी वाहने वापरत असलेल्यांना देखील दरवाढीची झळ सहन करावी लागत आहे. गेल्या महिन्यात दोनदा दरवाढ होऊन सीएनजी प्रतिकिलो ४.०६ रुपयांनी महागले. चार आणि १४ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी वाढ झाली. एकाच महिन्यात दोन वेळा चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
“कोरोनाचे रुग्ण व त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न आता कमी झालेला आहे. मात्र, सर्वांचीच आर्थिक स्थिती अद्याप सावरलेली नाही. छोटे व्यावसायिक, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक आजही पैशांच्या अडचणीचा सामना करीत आहेत. त्यामुळे अनेकांची यंदाची दिवाळी जेमतेम आहे. त्यात इंधन दरवाढ व वाढती महागाई नागरिकांचे आर्थिक हाल करीत आहे. कोरोनासह पैशांच्या कमतरतेतूनही आपण सावरायला हवे.”
– राम परदेशी, लघुउद्योजक

पेट्रोल डिझेलची किंमत
Esakal