IND vs AFG, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आज अफगाणिस्तानशी टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील तिसरा सामना रंगणार आहे. भारताने या स्पर्धेतील दोन सामने खेळून दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानचा संघ मात्र तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत भारतापेक्षा पुढे आहे. त्यामुळे भारताला आजचा आणि या पुढचे सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकणं अनिवार्य आहे. अशा वेळी, भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल यांनी संघातील वरिष्ठ आणि बड्या खेळाडूंबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा: IND vs AFG: रोहित-विराटचा एकत्र बॅटिंगचा सराव, पाहा Video
“दुसऱ्या संघांच्या जीवावर टीम इंडिया पुढील फेरीत गेली असं झालं तर भारतीय चाहते त्याचा कधीच अभिमान बाळगणार नाहीत. तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल किंवा सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला स्वत:च्या बळावर पुढे जावं लागेल. दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे आता निवड समितीने संघातील बड्या खेळाडूंना संधी द्यायची की नाही याचा नीट विचार केला पाहिजे. हीच वेळ आहे. बड्या खेळाडूंच्या भवितव्याचा आताच विचार करा”, असा सल्ला कपिल देव यांनी निवड समितीला दिला.

IND वि AGF
हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…
“निवड समितीने एक विचार करायला हवा की ज्या युवा खेळाडूंनी IPL मध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांना संघात संधी द्यायला हवी की नको. ती वेळ अद्याप आली आहे की नाही? आपण पुढच्या फळीतील खेळाडू कसे घडवू शकतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे. नव्या पिढीतील खेळाडूंचा संघ पराभूत झाला तर त्याचा फारसा विपरित परिणाम होणार नाही. याऊलट त्यांना चांगला अनुभव गाठीशी मिळेल. पण निवड समिती जर अनुभवी खेळाडूंनाच संधी देत राहिलं आणि त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर मात्र साऱ्यांवरच टीका होत राहिल. त्यामुळे आता BCCI ने यात लक्ष घातलं पाहिजे आणि जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं पाहिजे”, असं महत्त्वाचं विधान कपिल देव यांनी केलं.
Esakal