पुणे : ऐन दिवाळीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह व जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. कुठे होणार पाऊस…जाणून घ्या सविस्तर…

लक्षद्विप दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या 3 दिवसात ढग वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लक्षद्विप-कर्नाटक किनारपट्टीत द्रोणीय स्थिती असल्याने राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तसेच कोल्हापूर, साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येतेय. तसेच मुंबई-ठाण्यात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तीन ते चार दिवस राज्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here