हर्णे : ब्रिटिशकालीन पॅसेंजर जेटीला लवकरच नवीन रुपडे येत आहे. त्याचच भूमिपूजन तालुक्याचे आमदार श्री. योगेश कदम यांच्याहस्ते नुकतंच पार पडलं.

दरम्यान, हर्णे गावाला ब्रिटिशकाळात सुवर्णदुर्ग असे नाव होते त्यावेळी सुवर्णदुर्ग हा तालुका होता. त्यावेळी वाहनांची कमतरता होती त्यामुळे वाहतूक मोठमोठ्या बोटी व गलबतांमधून व्हायची. मुंबईला जायच असेल तर पॅसेंजर वाहतूक करणारी शिडाची गलबत होती. ती गलबत जेटीपासून थोडी लांबच उभी राहत असत आणि जेटीपासून एक बोट त्याला पूर्वी खपाट म्हणत असत ती घेऊन आलेल्या माणसांना आणायला किंवा मुंबईला जाणाऱ्या माणसांना सोडायला जात असे. त्यावेळी याच जेटीचा वापर होत असे इंग्रजांच्या काळात समुद्रमार्गे होणाऱ्या सर्व व्यवहारांच्यावेळी याच जेटीचा वापर केला जात होता.

दरम्यान, चिपळूण, खेडचे रहिवाशी सुद्धा याच गलबतांमधून मुंबईमधून येत असत त्यावेळी चिपळूणला जाणाऱ्या एस टीच्या गाड्या याच जेटीवर येऊन थांबत असत. काही वेळेस गलबत येण्यास उशीर झाला तर गलबत किंवा प्रवासी बोट येईपर्यंत गाड्या थांबत असत. तसेच त्याकाळातली लोक याच जेटीवर बसून बोट किंवा गलबत कधी येतंय याची वाट बघत बसायचे आणि आले की त्यातच बसून मुंबई प्रवास करायचे.

साधारण अंदाजे १९७० पर्यंत ही प्रवासी वाहतूक सुरू होती असे गावातील माजी सरपंच अंकुश बंगाल यांनी सांगितले. आज त्या जेटीचा वापर मच्छीमार बांधवांकरिता होत आहे. मासेमारी नौका मासेमारी करून आली की जेटीपर्यंत येऊ शकत नाही. त्यावेळी छोट्या बोटींच्या साहाय्याने हे बोटीतील खलाशी जेटीवर येतात. या छोट्या बोटी जेटीजवळ उभ्या करून पुन्हा समान वगैरे मासेमारीकरिता लागणारे साहित्य घेऊन जातात. अश्याप्रकारे आजही या जेटीचा वापर होत आहे. तसेच पर्यटन हंगामाच्या दिवसात सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. याठिकाणी पर्यटकांना फिरवण्यासाठी छोट्या नौका आहेत. त्या देखील याच जेटीचा वापर करून किल्ल्यामध्ये पर्यटकांना घेऊन जातात पुन्हा आणून सोडतात. पर्यटक देखील ज्यावेळी हर्णे मध्ये येतात त्यावेळी याच जेटीवर उभं राहून अथांग समुद्र पाहणं तसेच दाट गर्दीने उभ्या असलेल्या मासेमारी नौकांच निरीक्षण करण्याचा आनंद लुटत असतात.

हेही वाचा: रहस्यकथांचे बादशहा गुरुनाथ नाईक काळाच्या पडद्याआड

या जेटीच सुशोभीकरण होणं गरजेचं होतं याकरिता मच्छीमार बांधवांनी आमदार कदम यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याचाच विचार करून आमदार योगेश कदम यांनी मेरिटाईम बोर्डाकडून ५०,९०,४५५/- रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन त्याच भूमिपूजन केलं आहे. सदरची जेटी दोन्हीही बाजूने लांबी आणि रुंदीने वाढणार असल्याचं मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या पॅसेंजर जेटीला नवीन रूपडे मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here