साधारणपणे मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्वच बाबींची काळजी पालकांना असते. मुलींना चांगलं भविष्य मिळावं, त्यांना चांगलं लिहिता-वाचता यावं, यासाठी काय करावं, असा विचार अनेकदा पालक करत असतात.

साधारणपणे मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्वच बाबींची काळजी पालकांना असते. मुलींना चांगलं भविष्य मिळावं, त्यांना चांगलं लिहिता-वाचता यावं, यासाठी काय करावं, असा विचार अनेकदा पालक करत असतात. वास्तविक, सर्वात मोठी चिंता मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाची असते. कारण, या दोन्ही कामांसाठी खूप पैसा खर्च होतो.
त्यामुळं पालकांनी मुलींच्या नावावर कुठेतरी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या उच्च शिक्षण आणि लग्नाच्या वयात आल्यावर त्या गुंतवणुकीच्या रकमेचा योग्य वापर करता येईल. मुलींच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगली योजना म्हणजे, ‘सुकन्या समृद्धी योजना’! यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि तुमचे पैसेही सुरक्षित राहतील.
सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदर वार्षिक 7.6 टक्के आहे. त्रैमासिक आधारावर त्यात वाढ किंवा घट देखील होऊ शकते. या योजनेत गुंतवलेले पैसे चक्रवाढ व्याजाच्या आधारावर वाढतात. चक्रवाढ व्याज म्हणजे, तुम्हाला फक्त फायदा होतो.
या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो. यात एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एका महिन्यात किंवा एका आर्थिक वर्षातील ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही आणि या योजनेत जमा केलेल्या रकमेला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत देखील सूट देण्यात आलीय.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अट अशी आहे, की तुमच्या मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असावं आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खाते जास्तीत-जास्त दोन मुलींच्या नावानेच उघडता येईल. तथापि, जुळी किंवा तीन मुलं जन्माला आल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात. तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.
या योजनेत जास्तीत-जास्त 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते, तर या योजनेत उघडलेली खाती उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी बंद केली जाऊ शकतात. मात्र, जर मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले, तर अशा परिस्थितीत खाते बंद केले जाऊ शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here