IND vs AFG, T20 World Cup 2021: तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्ताच्या संघाला भारताने ६६ धावांनी पराभूत केले. भारतीय फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांची दमदार अर्धशतके आणि मधल्या फळीची फटकेबाजी यांच्या जोरावर भारताने २० षटकात २१० धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान अफगाणिस्तानला पेलले नाही. त्यांचा डाव २० षटकात १४४ धावांपर्यंतच जाऊ शकला. भारताने पहिले दोन सामने मोठ्या फरकाने गमावल्यानंतर त्यांना अफगाणिस्तान विरूद्धच्या विजयाने फायदा झाला. पण त्यानंतर रोहितने जे विधान केलं त्यावरून एका नव्या चर्चेचा उधाण आल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा

पाकिस्तानविरूद्धचा सामना गमावल्यानंतर विराट कोहली पत्रकार परिषदेला आला होता. न्यूझीलंडशी पराभूत झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. त्यावेळी त्याने एक खळबळजनक विधान केलं. त्यावरून त्याचा निशाणा कर्णधार विराट कोहलीच्या दिशेने असल्याची चर्चा रंगली.

रोहित शर्मा

रोहित शर्मा

रोहित म्हणाला, “आज सर्व खेळाडूंचा मैदानात उतरतानाचा दृष्टीकोन खूपच सकारात्मक होता. पहिल्या दोन सामन्यातदेखील अशाच प्रकारचा विचार घेऊन मैदानात उतरायला हवं होतं. पण आधी तसं घडलं नाही. खूप वेळ आपण घरापासून दूर क्रिकेट खेळत असू तेव्हा असं घडू शकतं. पण महत्त्वाचं म्हणजे निर्णयक्षमता ही काही वेळा अडचणीची बाब ठरते. आणि पहिल्या दोन सामन्यात तीच गोष्ट मारक ठरली”, असं रोखठोक मत रोहितने व्यक्त केलं.

हेही वाचा: IND vs AFG: चार वर्षांनी मिळालेल्या संधीचं अश्विनने केलं सोनं

दरम्यान, रोहित शर्माने पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पहिल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या. कालच्या सामन्यात मात्र त्याला सूर गवसला. रोहितने ४७ चेंडूत धडाकेबाज ७४ धावा कुटल्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here