पर्थ: तो ३ नोव्हेंबरचा दिवस होता. ऑस्ट्रोलियातील कारनारवन शहातील एका घरात अचानक पोलिसांची एक टीम शिरली. या ठिकाणी गेल्या १८ दिवसांपासून बेपत्ता असलेली चार वर्षांची मुलगी त्यांनी आढळून आली. या मुलीला शोधण्यासाठीच पोलिसांनी मोठं मिशन हाती घेतलं होतं. यासाठी तब्बल १०० हून अधिक पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं होतं.
बीबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, क्लिओ स्मिथ ही चार वर्षांची चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत एका शिबिरासाठी गेली होती. रात्रीच्यावेळी ती आपल्या पालकांसह तंबूमध्ये झोपलेली असताना अचानक ती गायब झाली. १६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रोलियातील कारनारवन नामक शहरात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी याची खबर देण्यात आल्यानंतर त्यांनी या मुलीला शोधण्यासाठी मोठी शोध मोहिम राबवली. अखेर पोलिसांनी तिला १८ दिवसांनंतर एका घरातून शोधून काढलं तसेच याप्रकरणी एका ३६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय घडलं होतं नक्की पाहुयात?
क्लिओ १६ ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी क्योबा ब्लोहोल्स कँपिंग ग्राऊंड येथे गेली होती. या ठिकाणी ती मध्यरात्री दीड ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गायब झाली. हे ठिकाण अतिशय दुर्गम असं ठिकाण मानलं जातं. पर्थ शहरापासून ते ९०० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी स्थानिक पर्यटनासाठी अनेक पर्याय आहेत. याठिकाणचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, समुद्रात असलेल्या लेणी आणि तलाव पाहण्यासारखे आहेत.

ज्यावेळी क्लिओचं अपहरण झालं त्यावेळी ती तंबूमधील तिच्या बहिणीच्या पुढच्या कॉटवर झोपली होती. ज्यावेळी तिची आई जी तंबूच्या दुसऱ्या खोलीत झोपली होती, ती सकाळी उठली आणि तिनं क्लिओच्या खोलीकडे जाऊन पाहिलं तर तिला धक्काच बसला. कारण क्लिओ त्या ठिकाणी नव्हती तिच्या तंबूचा दरवाजाही उघडाच होता. क्लिओच्या आईनं पोलिसांना सांगितलं की, मी तिला तंबू बाहेर आणलं नाही पण ती गायब झाली होती. यावर हा अपहरणाचा प्रकार असावा हे पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी महत्वाची शोध मोहिम हाती घेतली. ज्यामध्ये १०० हून अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आलं. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे पोलीस उपायुक्त कर्नल ब्लँच यांनी या ऑपरेशनचा उल्लेख गवतात सुई शोधण्यासारखं असल्याचा केला.
क्लिओला शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी शब्दशः आकाश-पातळ एक केलं. घोड्यावर बसून, ड्रोन्सचा वापर करुन ते क्लिओचा शोध घेत होते. ६०० किमी पर्यंत रस्त्यावरुन जाणाऱ्या शेकडो लोकांच्या बँगा त्यांनी तपासल्या. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज, फोन डेटा यावरुनही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच क्लिओला शोधून देणाऱ्याला १ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं.
हेही वाचा: चीनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने तीव्र; इंटरनेट कंटेटवरील देखरेख वाढवली
पण फोनमधील डेटानेही तिला शोधण्यात महत्वाची भूमिका बजावली. एखाद्या कोड्याप्रमाणं अनेक गोष्टी तपासल्यानंतर अखेर त्याच्या कड्या एकाच ठिकाणी येऊन जुळल्या. त्यानुसार पोलीस कारनारवन शहरातील एका घरापर्यंत पोहोचले आणि तिथच त्यांना क्लिओ आढळून आली. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला याप्रकरणी ताब्यात घेतलं. पण या अपहरणनाट्याच्या सर्व बाजू अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत त्या समोर याव्यात यासाठी पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. यासाठी डिटेक्टिव्ह, श्वान पथक यांचाही वापर करण्यात आला होता.
Esakal