ग्लास्गो : कोरोना काळात कार्बन उत्सर्जनात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच व्यवहार पूर्वपदावर येत असताना कार्बनचे उत्सर्जनही जवळपास पूर्वपदावर आल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उत्सर्जन वाढण्यात चीनचा मोठा वाटा असल्याचे शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे.
शास्त्रज्ञांचा हा गट हरीतगृह वायूंच्या उत्सर्जनाचा वारंवार आढावा घेत असतो. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्येच कार्बन उत्सर्जनाची पातळी २०१९ या वर्षीच्या पातळीच्या जवळपास गेली आहे. २०१९ मध्ये ३६.७ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड हवेत उत्सर्जित झाला होता. या वर्षाअखेरीपर्यंत जवळपास इतकाच, म्हणजे ३६.४ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळणार असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी हे प्रमाण ३४.८ अब्ज टन इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.९ टक्क्यांनी उत्सर्जन वाढले आहे. तापमानवाढीचे संकट समोर असतानाही बहुतेक देशांमध्ये पूर्वीप्रमाणेच कार्बनचे उत्सर्जन पुन्हा सुरु झाले असून यामध्ये सर्वाधिक वाटा चीनचा आहे. जगभरातील कार्बनचे उत्सर्जन मूळपदावर येण्यासही चीनच कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
Esakal