New Zealand vs Namibia, T20 World Cup: केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवत भारताचं टेन्शन वाढवलं. न्यूझीलंडने नामिबियाच्या संघाला ५२ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत पाकिस्तान खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्यांनी मोठ्या फरकाने नामिबियाला पराभूत केल्यामुळे आता भारताचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.

न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६३ धावांची मजल मारली. मार्टीन गप्टील (१८) आणि डॅरेल मिचेल (१९) हे दोन सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. केन विल्यमसनला सुरूवात चांगली मिळाली होती. पण तोदेखील २८ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ डेवॉन कॉनवेही १७ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ८७ अशी झाली होती. पण जिमी निशम आणि ग्लेन फिलीप्स या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. फिलीप्सने नाबाद ३९ तर निशमने नाबाद ३५ धावांची खेळी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला २० षटकात ७ बाद १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्टीफन बार्ड (२१) आणि मायकल वॅन लिंगन (२५) या सलामीवीरांनी डावाला चांगली सुरूवात केली होती. पण पुढील फलंदाजांनी फारशी चमक दाखवली नाही. झेन ग्रीनने २३ धावा करत काही काळ संघर्ष केला, पण अखेर डाव संपेपर्यंत त्यांना १११ धावांपर्यंतच पोहोचता आले. टीम सौदीने ४ षटकात १५ धावा देऊन २ बळी टिपले तर ट्रेंट बोल्टने ४ षटकात २० धावा देऊन २ गडी बाद केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here