दिवाळीचे एक वैशिष्ट्य असते. दिवाळीत अंधारातही सगळीकडे प्रकाश असतो. गोड पदार्थांमुळे सर्वत्र गोडी असते. घर सजल्याने, नवीन कपडे घेतल्याने सगळीकडे नवनवे वातावरण असते. यामुळे सर्वत्र आनंद असतो. उत्साह असतो. अन् तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो. प्रत्येकाच्या हालचालीतून जाणवत असतो. दाराला तोरण आणि फुलांच्या माळा बांधून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न केला जातो. सुंदर असावे, सुंदर दिसावे, सुंदर करावे, सुंदर बघावे, अवघे जग सुंदर करून सोडावे, ही माणसाची मूळ प्रवृत्ती दिवाळीत दिसून येते. यामध्ये निसर्गाला सोबत घेणे आवश्यक आहे. ही जाणीवही दिसते. निसर्गाशिवाय माणूस अपूर्ण आहे. निसर्गाची आपणाला किती गरज आहे, हे सर्व मुख्य सण- उत्सवांमधून अधोरेखित होते. त्याला दिवाळीही अपवाद नाही.

संध्याकाळ होत आली, अंधाराचे साम्राज्य पसरू लागले की दिवे, पणत्या लावल्या जातात. अंधाराला उजळून टाकले जाते. घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात पणत्या लावल्या जातात. आख्खं घर उजळून टाकलं जातं. अंधार पळून जातो. पणत्यांचा उजेड बघायला अंधारही लपून- छपून येत असतो. डोकावून बघत असतो. माणूस म्हटलं की, सुख-दुःख येणारच. अंधार- उजेड हे जसे शाश्वत आहेत. तसे सुख- दुःखाचे आहे. म्हणून अंधार पळविण्यासाठी जशी प्रकाशाची गरज आहे. अन् प्रकाश आणण्यासाठी जशी दिव्यांची, पणत्यांची गरज आहे.‌ तसेच दुःख पळविण्यासाठी सुखाची गरज असते. म्हणून माणूस सुख शोधत असतो. अंधारात एखादी पणती रस्ता दाखवते. तसेच सुखाचा एक धागा दुःख विसरण्याचा मार्ग दाखवतो. दिवाळीत तर पणत्यांची रांग असते. म्हणून दिवाळी आनंद, सुख घेऊन येते. आपल्याकडे जर उजेड जास्तीचा असेल तर त्यातला थोडा उजेड अंधारातल्या माणसांना द्यावा. एक आपल्याकडची पणती त्यांच्या हाती ठेवावी. त्यांच्याही आयुष्यात थोडा उजेड आणण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपलाही उजेड दुपटीने वाढतो. आपल्याच उजेडात आपण उजळून निघून‌ डोळे दिपून घेतले तर आपल्या आसपासचा अंधार आपल्याला दिसणार नाही. लायटिंगचा भडक उजेड करण्यापेक्षा पणतीचा मंद पण आश्वासक प्रकाश ठेवावा. म्हणजे आसपासच्या आपल्याच माणसांच्या आयुष्यात आपणालाही मदतीची एक पणती लावता येईल. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करता येईल.

दिवाळीत गोड खायला असते. तसे तिखटही खायला असते. आयुष्यही गोड- तिखटाने भरलेले आहे. नेहमीच गोड खायला मिळेल असे नाही. कधीकधी तिखटही खावे लागते. दिवाळीचे तिखट आपण आवडीने खातो. तसे आयुष्यातील तिखट अनुभवही आपणाला सहज पचवता यायला हवेत. हेच तर दिवाळी आपणाला सांगत असते. जीवन‌ जगत असताना तिखट माणसे, तिखट प्रसंग, तिखट दिवस, तिखट वेळ प्रत्येकावर येत असते. तिखट लागले की, आपण गोड खातो. आणि तिखट कमी करतो. तसे आयुष्यातले तिखटही धैर्य, आत्मविश्वास आणि आशा या गोडाने आपल्याला कमी करता यायला हवे. तिखटगोड हे दिवाळीमध्ये असते. वर्षभर नाही. तसे आयुष्यातही तिखट कायम राहत नाही. म्हणून संयम ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे. आणि माणसाने आशावादी असायला हवे.

दिवाळीत अंगणात सुंदर रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. यामुळे घराच्या सौंदर्यात कमालीची भर पडते. घर प्रसन्न दिसू लागते. आपले जीवनही आपणाला रंगीबेरंगी, सुंदर आणि प्रसन्न करता यायला हवे. एखादा छंद, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, हे साध्य करता येऊ शकतं.‌ आनंद शोधता येऊ शकतो. वाचन, लेखन, खेळ, कलाकृती बघणे, पर्यटन, मैत्री, समाजसेवा यामधून एखादी रांगोळी निवडून ती आपल्या आयुष्याच्या अंगणात सुंदररीत्या काढता, सजवता येऊ शकते. आणि जीवन रंगीबेरंगी करता येते. जीवनाचा खरा आनंदही घेता येतो.

दिवाळीला आपण नवीन कपडे घेतो. घर साफसूफ करून नव्याने सजवतो. खायला नवीन करतो. तसं आयुष्यातही नवनवीन करता यायला हवं. सतत नावीन्याचा ध्यास मनाला असावा हेच तर दिवाळी सांगत असते. या नाविन्यातून आपलं आयुष्य नवंनवं‌ आणि हवंहवं करता यायला हवं. तरच जीवनातली गोडी टिकून राहते. दिवसादिवसाने जीवन फुलत, खुलत जाते.

दिवाळीत पाहुणेरावळे येतात. आपण त्यांच्याकडे जातो. काही खायचं किंवा भेटवस्तू देतो. आणि आपल्यातलं नातं आणखी घट्ट करतो. ही भेटवस्तू महाग असावी, याची गरज नसते. ‘शुभ दीपावली’ असे लिहिलेला एखादा साधा कागदही महागातल्या महाग भेटवस्तूच काम करतो. कधी- कधी तर प्रत्यक्ष साधी भेट घेणं हीच सगळ्यात मोठी भेट असते. प्रेमाने नात्यांची रेशीमगाठ घट्ट करण्यासाठी तर दिवाळी येत असते. आणि दिवाळी एक निमित्त असते. ही रेशीमगाठ वर्षभर कशी घट्ट राहील, यासाठी आपण धडपडले पाहिजे.

अशा साध्यासुध्या पण नातं घट्ट करणाऱ्या आणि जीवनात आनंद भरणाऱ्या दिवाळीत कर्णकर्कश फटाके कधी शिरले कोणास माहीत! फटाके आवाज करतात. फटाके प्रदूषण करतात. फटाके इजा पोहोचवतात. फटाके दिवाळीची लयच बिघडवून टाकतात. मग अशा शांत, प्रकाशमय दिवाळीत हे फटाके कुठून आणि कसे आले? कसेही आले आणि कुठूनही आले तरी आपण ते आपल्या आयुष्यातून काढून टाकू शकतो. या दिवाळीपासून आपण ठरवायला हवे की, दोन पणत्या जास्त लावू पण फटाके फोडणार नाही. अन् प्रदूषणाला हातभार लावणार नाही. या संकल्पासह सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here