निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी भारतातील लोक परदेशात जातात. पण, आज आम्ही ईशान्य भारतातील काही सुंदर ठिकाणं दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक् व्हाल. आजही ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी फारसे लोक पोहोचू शकत नाहीत.
नोहकलिकई फॉल्स, मेघालय : मेघालयातील नोहकलिकई धबधबा हा भारतातील 5 वा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा चेरापुंजीपासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. ‘लिकाई’ या स्थानिक मुलीनं या धबधब्याजवळ असलेल्या खडीवरून उडी मारली आणि जीव दिला. त्या मुलीच्या नावावरूनच ‘नोहकलिकई’ असं याला नाव पडलंय.नीर महाल, त्रिपुरा : नीर महाल हे रुद्रसागर नावाच्या नैसर्गिक तलावाच्या मध्यभागी वसलेलं आहे. हा महाल महाराजा वीर बिक्रम किशोर माणिक्य यांनी 1930 साली बांधला होता. हा महाल त्रिपुराची राजधानी आगरतला पासून 53 किमी अंतरावर आहे.उमंगोट नदी, मेघालय : मेघालयातील उमंगोट नदी ही देशातील सर्वात स्वच्छ नदी असल्याचं म्हटलं जातं. त्याचं पाणी इतकं स्वच्छ आहे, की पाण्याखाली असलेला प्रत्येक दगड स्पष्टपणे दिसतो. ही नदी शिलाँगपासून 95 किमी अंतरावर भारत-बांगलादेश सीमेजवळ असलेल्या पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातून वाहते.लोकताक तलाव (फ्लोटिंग लेक), मणिपूर : लोकताक सरोवर मणिपूरमधील तरंगतं तलाव म्हणूनही ओळखलं जातं. हा तलाव तरंगत्या वनस्पती आणि मातीपासून बनवलेल्या बेटांसाठी प्रसिद्ध आहे. या बेटांना ‘कुंदी’ म्हणतात. हे जगातील एकमेव तरंगणारं सरोवर आहे.जुखू व्हॅली, नागालँड-मणिपूर : नागालँड आणि मणिपूर सीमेवर वसलेली जुखू व्हॅली नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी निर्जीव आणि निर्जन समजल्या जाणाऱ्या या खोऱ्यात आता हिरवेगार डोंगर, निळे आकाश आणि वाहणारी नदी पाहून आपण स्वर्गात पोहोचलो आहोत, असं वाटतं. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.उनाकोटी, त्रिपुरा : उत्तर त्रिपुरामध्ये उनाकोटी हे ठिकाण आहे. जिथं घनदाट जंगलात खडकांवर देवदेवतांच्या असंख्य मूर्ती कोरल्या गेल्या आहेत. पण, मोठमोठ्या खडकांवर या मूर्ती कोणी कोरल्या हे कोणालाच माहीत नाही आणि कदाचित, ही गोष्ट इथं भेट देणाऱ्या लोकांना आश्चर्यचकित करते.