– सुनील लिमये
सह्याद्रीच्या रांगा आपल्या राज्याच्या पश्चिम भागात पसरलेल्या आहेत. हा डोंगरखोऱ्यांचा प्रदेश छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांसाठी व स्वराज्य रक्षणाच्या कामातील त्याच्या स्थानामुळे प्रसिद्ध आहेच; पण त्याचबरोबर सातपुडा, विदर्भ व मराठवाडा या क्षेत्रातही छोट्या-मोठ्या ३८८ दुर्गांची व भुईकोट किल्ल्यांची नोंद असून, गढ्या व लष्करीदृष्ट्या महत्त्वाची ठाणी धरली तर ही संख्या ४५० च्या वर जाते. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये ६३, रायगडमध्ये ५६, पुण्यामध्ये ३६, रत्नागिरीमध्ये २८, सिंधुदुर्गमध्ये २७, साताऱ्यामध्ये २४ किल्ले आहेत. मराठवाडा व खानदेश आणि विदर्भात जवळपास ९१ छोटे-मोठे किल्ले आहेत.
आज किल्ला म्हटले की, साधारणतः उंच व भव्य पहाड आणि त्यावर छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले जसे की, राजगड, तोरणा, रायगड नजरेसमोर येतात. मराठवाडा, विदर्भ, खानदेश येथेही बरेचसे किल्ले आहेत; पण स्वराज्यरक्षणार्थ छत्रपती शिवरायांनी जे किल्ले बांधले त्याप्रमाणे या किल्ल्यांकडे सर्वांचेच लक्ष लगेच जात नाही व यापेक्षा एक वेगळी बाब म्हणजे, आज जर कोणाला सांगितले, की मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ किल्ले होते व त्यापैकी ८ आज अस्तित्वात आहेत व ३ मात्र जागेवर नाहीत, तर फारच कमी जणांचा त्यावर विश्वास बसेल.

मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा दुर्गभटकंतीसाठी जातो. या दुर्गभटकंतीने मला आयुष्यात निडर बनवले. वन विभागामधील माझ्या नोकरीच्या कालावधीत क्षेत्रीय भेटीदरम्यान मी ८० पेक्षा जास्त किल्ले पाहिले आहेत व आतापर्यंत महाराष्ट्रातील ९५ किल्ले मी स्वतः एकट्याने वा माझ्या सहकाऱ्यांसोबत पाहिलेले आहेत. २०१७ मध्ये मी ठाणे येथे ‘मुख्य वनसंरक्षक’ म्हणून काम करत असताना माझी अशाच एका दुर्गभ्रमंतीसाठी ‘अवलिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश रघुवीरशी भेट झाली, की जो स्वतःचा नोकरीधंदा करत असतानाही सह्याद्री प्रतिष्ठानसाठी स्वयंसेवक व त्या प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि त्याने तर भारतातील १२०० च्या वर किल्ले व गढ्या पाहिलेल्या आहेत. अशाच एका भेटीत त्याने मला सांगितले, की मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ११ किल्ले होते आणि आता त्यापैकी ८ किल्ले कसेबसे तग धरून उभे आहेत. खरे तर ऐकून मला मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ठाण्यात असताना वसईचा किल्ला व घोडबंदरचा किल्ला माझ्यादृष्टीने जवळ असलेले किल्ले होते; पण मुंबईत कधी ११ किल्ले असतील व त्यातील ८ किल्ले आपण आता पाहू शकू, हे माझ्या मनातही आले नव्हते. त्यामुळे मी त्वरेने गणेशबरोबर मुंबईतील किल्ले बघायची योजना ठरवली.
मुंबईचा इतिहास पाहता, मुंबईकडील गुंफा उत्तरेकडील साष्टी बेटात खोदल्या गेल्या आहेत; पण मुंबईचे किल्ले दक्षिणेकडील बेटांवर आरूढ आहेत. हा फरक बरेच काही सांगून जातो. काळ बदलला व त्याबरोबर सत्तेची केंद्रे उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकली. आता सत्तेला भय होते ते सागरी आरमारी आक्रमणांचे. त्यामुळे बेटांच्या भौगोलिक संरक्षणाच्या व तत्कालीन रणनीतीच्या गरजा आखून दिल्या गेल्या व त्यानुसार सतराव्या व अठराव्या शतकात मुंबईत किल्ले उभे राहिले. त्यातील आता उरलेल्या किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण साऱ्या दुर्गप्रेमींनी पुढे यायला हवे. कारण तो एक चालता-बोलता इतिहास आहे.
मुंबईत ज्या ११ किल्ल्यांची उभारणी झालेली आढळून येते, ते म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याची भौगोलिक ठाणी असल्यामुळे गरजेनुसार त्यांची बांधणी, विस्तार, डागडुजी व पुनर्बांधणी होत असे. बहुतेक किल्ले सतराव्या व अठराव्या शतकातील आहेत. पण माजगाव किल्ला, शिवडी किल्ला, शीव (सायन) किल्ला व माहीम किल्ला यांचे उल्लेख १६ व्या शतकात आढळतात. या किल्ल्यांपैकी वरळी, माहीम, बांद्रा, काळा किल्ला (धारावी किल्ला), रीवा किल्ला, शीव किल्ला (सायन), शिवडी किल्ला व मढ (वर्सोवा) हे किल्ले आज अस्तित्वात आहेत तर डोंगरी, माजगाव व बॉम्बे फोर्ट कॅसल आता अस्तित्वात नाहीत. वरील किल्ल्यांपैकी शिवचा किल्ला केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली तर माहीम, बांद्रा, काळा किल्ला, शिवडी व सेंट जॉर्ज हे किल्ले महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे आहेत.

हे किल्ले त्या काळामध्ये भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी बांधले होते. मुंबईच्या तत्कालीन बेटांमध्ये फार कमी जलमार्ग होते. माहिमची खाडी ही तर दलदलीने भरलेली होती; परंतु ही जागा प्रमुख व्यापारी व सत्तेचे केंद्र असल्याने तिला खूप महत्त्व होते. माहिमची खाडी ही मुंबईच्या तत्कालीन उर्वरित बेटांचे प्रवेशद्वार होती. त्यामुळे पोर्तुगिजांच्या व त्यानंतरच्या इंग्रजांच्या काळात सर्वाधिक किल्ले या खाडीच्या मुखाजवळ बांधण्यात आले. ‘बांद्रा’ व ‘वरळी’ हे किल्ले खाडीच्या मुखाजवळ बांधण्यात आले आहेत. तत्कालीन ११ किल्ल्यांपैकी ‘बॉम्बे फोर्ट कॅसल’ हा किल्ला त्या परिसरात झालेल्या विकासकामांमुळे व वेगवेगळ्या बांधकामांमुळे आता अस्तित्वात राहिलेला नाही, तर माजगावचा किल्ला जंजिऱ्याच्या याकूत खानाने जिंकल्यानंतर त्यात त्याला किल्ल्यावर दारुगोळा व बरीचशी सोन्याची नाणी, तोफा मिळाल्यानंतर त्याने वास्तू जाळून नष्ट केल्या; पण तरीही त्यातील काही वास्तू त्यानंतरही शिल्लक राहिल्या होत्या.
१९४२ मध्ये मुंबईला बसलेल्या वादळाच्या तडाख्यात या किल्ल्यावरील वास्तू व छपरे उडून गेली. ‘डोंगरी किल्ला’ ज्या टेकडीवर होता तेथे इंग्रजांच्या सैनिकांचे वास्तव्य व ठाणे होते; परंतु पुढे त्यांना त्याची गरज न उरल्याने त्यांनी तो किल्ला पाडून टाकला. इंग्रजांनी ठेवलेल्या अभिलेखांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख ‘माजगाव हिल्स’ असा आहे व ज्या टेकडीवर हा किल्ला होता तिला ‘नवरोजी हिल्स’ म्हणून ओळखले जात होते. कालांतराने जवळच्या समुद्राच्या लाटांमुळे हा भागही झिजून गेला व त्या जागेवर आज मुंबई हार्बर रेल्वे लाईन आहे. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर मात्र हे मुंबईचे किल्ले आपण पाहायचेच, या कल्पनेने झपाटून गेलो व माझी गणेशबरोबरची मुंबईतील किल्ले बघण्याची योजना कार्यान्वित झाली. मुंबईतच हिंडायचे असल्यामुळे शनिवार, रविवार हे दिवस पक्केच करून आम्ही मुंबईतील किल्ले बघायचे ठरविले. यासंबंधीची असणारी सर्व माहितीही गणेशने जुन्या पुस्तकांद्वारे व कागदपत्रांवरून मिळवली असल्याने हे फारसे कोणाला माहीत नसलेले किल्ले बघण्याची माझी उत्सुकता मात्र प्रचंड वाढली होती.

वरळी किल्ला
आम्ही पहिली धडक मारायची ठरवली ती वरळीच्या किल्ल्यावर. दादरवरून वरळी कोळीवाड्याच्या बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरले की, मच्छीमार वसाहतीतून ५-१० मिनिटांतच आपण या किल्ल्यावर पोहोचतो. अतिशय छोटा व आटोपशीर असा हा किल्ला आहे. तत्कालीन माहिमच्या उपनगरावर (अरबी समुद्र) पाळत ठेवण्यासाठी दक्षिणेस वरळी व उत्तरेस बांद्रा असे किल्ले बांधले गेले. वरळी बेट ही एक त्यावेळेस लांबलचक टेकडी होती. सागरात शिरलेले तिचे उत्तर टोक आजही माचव्यांना वारा व लाटांपासून सुरक्षिततेसाठी आडोसा मिळवून देते. कोनाकृती बुरुज व उतरत्या भिंती असलेला हा अगदी पक्क्या पोर्तुगीज शैलीचा किल्ला पोर्तुगिजांनी १६७५ मध्ये बांधलेला आहे व आजही तो त्याच्या भव्य भक्कम भिंतीमुळे टिकून आहे. वरळी सी लिंकवरून मुंबईकडे जाताना डावीकडील मच्छीमार वसाहतीमध्ये हा किल्ला अगदी प्रकर्षाने ठळकपणे उठून दिसतो व बऱ्याचदा हिंदी /तेलगू चित्रपटांमधूनही याचे दर्शन होते. या किल्ल्यातील हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय मात्र येथून जाता येत नाही.
शीव (सायन) किल्ला
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूला उतरून डाव्या हाताच्या फुटपाथने पाच मिनिटे चालल्यानंतर पूर्व द्रुतगती मार्ग येतो व हा महामार्ग ओलांडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पुरातन वृक्ष उभे असलेला रस्ता लागतो. या रस्त्याने दोन मिनिटांतच आम्ही शीव (सायन) या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर (शिवेवर) हा किल्ला बांधला आहे. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर या किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आले.

माहीम किल्ला
आमचा पुढचा टप्पा होता, माहिमचा किल्ला. माहिमचा हलवा बहुतेकांना माहीत आहे; पण इथला किल्ला मात्र बहुतांश जणांना माहीत नाही. पश्चिम रेल्वेच्या माहीम पश्चिम स्थानकावर उतरून मोरी रोडने माहीम समुद्रकिनाऱ्याने चालत गेल्यावर दहा मिनिटांवर या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. किल्ल्याचे प्रवेशद्वार वगळता आत संपूर्णपणे वस्ती झाल्याने सर्वसामान्यांना हा किल्ला जाऊन पाहणे शक्य होत नाही. मुंबईच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यांना जोडणाऱ्या माहिमच्या खाडीचे रक्षण करणारा हा किल्ला त्यावेळी जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ओळखला जात असे. मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून वेगळे करणाऱ्या महकावती ऊर्फ माहिमच्या खाडीच्या मुखावर १२ व्या शतकात प्रतापबिंब नावाच्या राजाने हा किल्ला बांधला व तेथे आपली राजधानीही वसवली.
या ठिकाणी त्याने विविध जातींच्या व विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना बोलावून व्यापार/ शास्त्र व संस्कृतीची बीजे मुंबईच्या या बेटांवर रुजवली. पुढे इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर याने सध्या अस्तित्वात असलेला हा किल्ला नव्याने बांधला. पुढे या किल्ल्यावर आधी पोर्तुगिजांनी व त्यानंतर डच लोकांनी स्वारी केली; परंतु तेथील स्थानिक भंडारी लोकांनी दिलेल्या लढ्यामुळे या किल्ल्याचा पाडाव होऊ शकला नाही. त्यानंतर १७ व्या शतकात जंजिऱ्याच्या सिद्दी याकूत खानाने या किल्ल्यावर हल्ला चढवून जिंकून घेतला व नंतर त्याने वर्षभर या भागात धुमाकूळ घातला. त्यानंतर काही काळाने इंग्रजांनी हा किल्ला जिंकून पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.

काळा किल्ला
किल्ले पाहणीच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ठरवले की, आता धारावी गाठायची व ‘काळा किल्ला’ पाहायचा. आजची एकसंध असणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समूह होती. ही बेटे ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी या बेटांचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवरील धारावी येथील या किल्ल्याला स्थानिक लोक ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखतात.
२००५ मध्ये मुंबईला आलेल्या मोठ्या पुरामुळे मिठी नदी व आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी हे नाव सर्वांनाच माहीत आहे. ज्या जागेत सद्यस्थितीत हा किल्ला आहे ती पाहिल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही व माझा मित्र गणेश याच्यामुळे हा मुंबईतील अमूल्य ठेवा मला बघता आला, याबाबत मी मनोमन त्याचे आभार मानले. या किल्ल्यावर असलेल्या शिलालेखावरून १७३७ मध्ये मुंबईचा गव्हर्नर जेरॉल्ड ऑगियर याने हा किल्ला बांधला असे लक्षात येते. हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्याने तेथील स्थानिक लोक काळा किल्ला नावाने ओळखतात व त्याचप्रमाणे त्या काळी दारुगोळा असलेल्या कोठीसही काळा किल्ला म्हणण्याचा प्रघात होता. या किल्ल्याची गमतीची गोष्ट म्हणजे, सद्यस्थितीत या किल्ल्यात जाण्यासाठी वाट नाही. कारण या किल्ल्याच्या आजूबाजूला संपूर्ण दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या किल्ल्यात जाण्यासाठी ८ फूट भिंत चढून जावी लागते व वर चढल्यावर आम्हाला तेथे स्थानिकांनी पाळलेल्या चक्क काळ्या कडकनाथ कोंबड्याही बघता आल्या. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेला सायन-बांद्रा लिंक रोडवरून साधारण दहा मिनिटे चालल्यानंतर ओ.एन.जी.सी. इमारतीच्या अलीकडे उजव्या बाजूला ‘काळा किल्ला’ गल्ली लागते व या गल्लीच्या टोकाला हा किल्ला आहे. त्यामुळे येथे आम्ही अगदी सहजरीत्या पोहचू शकलो.

रीवा किल्ला
मुंबईतील आणखी एक आश्चर्य म्हणजे ‘रीवा किल्ला’. मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावरून पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथवरून चालत गेल्यावर लगतच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात पोहोचलो आणि या महाविद्यालयाच्या परिसरात एका टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली दिसून आली व त्याच्या मधोमध एकमेव बुरुज शिल्लक असलेला हा किल्ला आहे. शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज गव्हर्नर जेरॉल्ड ऑगियरने १६७२ मध्ये बांधलेल्या या किल्ल्याचा एकमेव बुरुज आज शिल्लक आहे व हा काळाची साक्ष देणारा खास असा किल्ला आहे. माहिमच्या खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली असल्याने हा किल्ला माहिमच्या खाडीतून होणाऱ्या बोटी व गलबताच्या व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता, हे आजही सुरू असलेल्या व या बुरुजांपासून दिसणाऱ्या बोटींच्या वाहतुकीवरून दिसून येते.
शिवडीचा किल्ला
निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला व हार्बर रेल्वे मार्गावर शिवडी स्थानकाच्या पश्चिमेला एक सुंदर असा हा किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला. शिवडी रेल्वे स्थानकावर उतरून कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याने सरळ दहा मिनिटे चालत गेल्यानंतर आम्ही शिवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत व किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे शिवडीची दलदल हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असून, दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान लाखोंच्या संख्येने येथे फ्लेमिंगो पक्षी येतात. १६ व्या शतकाच्या सुरुवातीस गुजरातच्या सुलतान बहादूरशहा याच्या ताब्यात हा किल्ला होता. हा सुलतान पिराचा भक्त असल्यामुळे त्याने या किल्ल्याला लागून एक दर्गा बांधला.
१५३४ मध्ये हा किल्ला सुलतानाने पोर्तुगिजांच्या ताब्यात दिला. त्यानंतर १६६३ पर्यंत म्हणजे जवळपास १२९ वर्षे शिवडी किल्ला तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते व त्यानंतर हा किल्ला पोर्तुगिजांनी इंग्रजांना आंदण म्हणून दिला. त्यानंतर १६८९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे मुघलांचा आरमारप्रमुख जंजिऱ्याचा सिद्दी याकूत याने हा किल्ला जिंकला व १७६८ मध्ये इंग्रजांनी या किल्ल्याचे नूतनीकरण करून या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला. एम. एम. एडवर्स यांच्या ‘राईज ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात १७४२ मध्ये मुंबई बेटांचे, त्यातील ७० हजार जनतेचे, बगीचे, राई (आमराई), भातशेती व मिठागरांचे संरक्षण करण्यासाठी या भागात इंग्रजांनी मुंबई फोर्ट किल्ला, माजगाव किल्ला तसेच डोंगरी व शिवडी येथील किल्ले बांधले, असे लिहिले आहे. त्यानंतर मलबार येथील मोपल्यांनासुद्धा इंग्रजांनी या किल्ल्यात कैदी म्हणून ठेवले व त्याचा तुरुंगासारखा उपयोग करून घेतला.
१८७३ ला बॉम्बे पोर्ट ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर या इमारतीचा वापर पोर्ट ट्रस्टच्या गोडाऊनसाठी होत असे. या गोडाऊनचे छत अर्धगोलाकृती असून, हे दगडी छत अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याची बांधणी जरा वेगळीच आहे. याच्या तटभिंती काटकोनात असल्यामुळे समोरून चटकन लक्षात येत नाही. किल्ल्यात लांबच लांब अशा दोन इमारती आहेत. त्यांचाच वापर कैदखाना म्हणून होत होता. शिवडी किल्ल्याच्या पूर्वेकडील खाडीत किनाऱ्यावरील भाग दलदलीचा आहे. तो ‘ओटोलिया’ वनस्पतीच्या पोषणास उत्तम असल्याने ही वनस्पती या दलदलीच्या भागात चांगलीच वाढलेली आहे. ही वनस्पती व त्यावर उपजीविका करणारे लहान प्राणी, कीटक हे येथे येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत सात महिने येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहावयास मिळतात.

मढ किल्ला
आम्ही वळलो मुंबई उपनगराकडे व ते म्हणजे मुंबई उपनगरामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या ‘मढ’ या किल्ल्याकडे. वर्सोवा गाव व मढ बेट यांच्यामध्ये असलेल्या खाडीच्या मुखावर हा किल्ला १६०० मध्ये पोर्तुगिजांनी बांधला. मुंबईत आजमितीस असलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये हा किल्ला जास्त सुस्थितीत आहे. मालाड पश्चिमेहून सुटणाऱ्या बेस्टच्या बसने मढ बेटाकडील १५ कि.मी. अंतरावरील वर्सोवा किल्ल्यावर जाता येते. बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरून किल्लेश्वर महादेव मंदिराकडे आम्ही चालत निघालो व किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहोचलो. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक वाट किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत जवळ जाते. या पायवाटेने तटबंदी बुरुजांच्या कडेने आम्ही किल्ल्याच्या बाहेरून फेरी मारू शकलो. मुंबईच्या उत्तरेकडील मढ आयलंड येथील छोट्या टेकडीवर हा मढचा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरूज शाबूत आहेत. हा किल्ला तीनही बाजूने जमीन असलेला व एका बाजूस अरबी समुद्र असलेला आहे. हा किल्ला सध्या सशस्त्र दलाच्या ताब्यात आहे. किल्ल्याचा तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘जंग्याची’ रचना करण्यात आली आहे. किल्ल्याच्या अरबी समुद्राकडील बाजूस असणारा चोर दरवाजा सध्या दगडांनी बंद केलेला आहे तसेच मुख्य प्रवेशद्वारही बंद करून बुरुजातून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बनविलेल्या आहेत.
बांद्रा किल्ला
माहिमच्या खाडीच्या मोक्याच्या ठिकाणी १६४० मध्ये साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर हा किल्ला बांधला गेला आहे. जागोजागी पोर्तुगीज राजवटीच्या खुणा व तेथे असलेले पोर्तुगिजांचे शिलालेख या किल्ल्यामध्ये बघावयास मिळतात. पोहोचण्यासाठी अतिशय सोपी अशी ही जागा आहे. पश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकावर उतरल्यावर आधी बांद्रा बँड स्टँड व तेथून ‘ताज लँडस्एन्ड’ हॉटेल संपले, की लगेचच त्यापुढे हा ऐतिहासिक किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे भग्न द्वार, पायऱ्यांची बांधणी, तेथून दिसणारा वरळी सी लिंक पूल, अथांग सागर, फेसाळणाऱ्या लाटा… खरंच, नितांत सुंदर अशी ही वास्तू आहे, जी आपण सर्वांनी पाहायलाच हवी.
(सुनील लिमये- हे महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत.)
Esakal