दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा व वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस साजरा केला जातो. सोन्यासह नवीन खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. अशा मंगलमय सोहळ्याची पहाटेपासूनच घरोघरी लगबग सुरु होती. सुवासिनींनी घरापुढे रांगोळी काढली.

फराळासह देवाला गोडधोड नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सुवासिनींनी पतीला औक्षण केले. त्यानंतर सोने खरेदीसह नवीन वाहन व इतर वस्तू खरेदीसाठी लगबग सुरु झाली. त्यामुळे सकाळपासूनच पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, सांगवी आदी ठिकाणच्या बाजारपेठेसह वाहनांच्या शो रूममध्ये गर्दी दिसू लागली. दरम्यान, अनेकांनी नवीन घरात गृहप्रवेश करण्यासह नवीन बांधकामाचे भूमिपूजन व दुकानांचे उदघाटन करण्यासही प्राधान्य दिले.
सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. बच्चे कंपनीसह कुटुंबीयांनी फटाके फोडण्याचा आनंद लुटला.

दिवाळी पाडव्याला अनन्य साधारण महत्व असल्याने विविध मंदिरांमध्येही सहकुटुंब दर्शनासाठी गर्दी झाली होती. चिंचवडगावातील श्रीमन महासाधु मोरया गोसावी मंदिर, आकुर्डीतील विठ्ठल मंदिर, खंडोबा मंदिर, श्री कृष्ण मंदिर, देहूतील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आदी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. तसेच दीपोत्सवही साजरा करण्यात आला.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. हा उत्सव दिवे प्रज्वलित करून साजरा करण्यात आला. निगडीतील भक्ती- शक्ती उद्यान, गणेश तलाव, भोसरीतील लांडेवाडी, देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर तसेच सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, चिंचवड आदी ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे परिसर दिव्यांनी उजळून निघाला. भक्ती शक्ती उद्यानातील दीपोत्सवात पंधरा हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. यामध्ये भव्य शंकराची पिंड व ओम साकारण्यात आले.
पाडव्याचा उत्साह अशातच ठिकठिकाणी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे भल्या पहाटे सुमधूर सूर कानी पडले. चिंचवडगाव, निगडी प्राधिकरण, जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरी आदी ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिग्गज कलाकारांनी कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गुरुवारी व शुक्रवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी फटाके फोडण्याच्या वेळीच हजेरी लावल्याने अनेकांची धांदल उडाली. मात्र, बच्चे कंपनीचा उत्साह कमी झाला नाही. पावसातही आडोसा शोधत फटाके फोडले.
न्यु श्रद्धा ज्वेलर्स, भोसरी : दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांनी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here