म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ काल दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रींची घटस्थापनेने करण्यात आला. मंदिराचे सालकरी यांच्या कृष्णात गुरव यांनी सपत्निक प्रमुख उपस्थितीत ‘श्री’च्या मंदिरात घटस्थापना केली. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थानच्या उत्सव मूर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम सनई- चौघडा मंगल वाद्याच्या सुरात मंदिर गाभाऱ्यासमोरील हत्ती शिल्प मंडपात महिलांच्या उपस्थित झाला.

‘श्रीं’च्या शाही मंगल विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर शिखर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासह दीपावली पाडव्यानिमित्त श्रींचे दर्शनासाठी भाविकांनी रांगेत व सुरक्षित अंतर ठेवीत श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
शाही विवाह सोहळ्यानिमित्त आज भाऊबीजेस नवरदेव श्री सिद्धनाथ व वधू देवी जोगेश्वरी यांची येथील राजबागेतील पुरातन म्हातारबाबा मंदिरास सालकरी, पुजारी, मानकरी यांचा मिरवणुकीने भेटीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता झाला. ही मिरवणूक श्रींच्या मंदिरात परत येत असताना फटाक्याच्या आतषबाजीने ठिकठिकाणी स्वागत करण्याची परंपरा आहे; परंतु यंदाच्या या मिरवणुकीपुढे फटाके फोडण्यास पोलिसांनी मनाई केली होती.
हेही वाचा: AUS vs WI: ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय; आफ्रिकेच टेन्शन वाढवलं
‘श्रीं’च्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम आज दुपारी होताच पारंपरिक पद्धतीने बारा दिवसांच्या नवरात्री सलग बारा दिवस उपवास समवेतच संपूर्ण नगरप्रदक्षिणा परिक्रमा उपक्रम पुजारी, मानकरी व भाविकांनी प्रारंभ केला. तुलसी विवाह दिवशी सोमवार (ता. १५) पहाटे पाच वाजता ‘श्रीं’चे घट उठविणे व रात्री ‘श्रीं’चा विवाह सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्यानंतर शनिवारी काळभैरव अष्टमी (श्रींचा जन्म- उत्सव कार्यक्रम) रात्री नऊ वाजता आयोजिण्यात आला आहे.
या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस रविवार (ता. ५ डिसेंबर) वधू- वराची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही शासनाचे यात्रा बंदी निर्बंध लागू असल्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय होण्याची शक्यता आहे.
Esakal