नाशिक रोड : १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने २०२१ हे स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. विजय गाथा सांगणारी स्वर्णिम विजय मशाल नाशिकच्या तोफखाना केंद्रात दाखल झाली असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी विजयी मशाल नेण्यात येत आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक सोहळा
एअरफोर्स देवळाली, एअरफोर्स ओझर, नाशिक पोलिस अॅकेडमी, त्र्यंबकेश्वर, पांडवलेणी परिसर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयातील एनसीसी आर्मी विंग, एअरविंग कॅडेट्स, भोसला मिलिटरी स्कूल, सर्वसामान्य नागरिकांना देखील स्वर्णिम विजय मशालीची दर्शन व्हावे याकरिता नागरी वसाहतीतून रस्त्याने विजय मशालीची मिरवणूक काढण्यात आली होती. नाशिकमधील भारतातील सर्वात मोठी स्कूल ऑफ आर्टिलरी येथे विजय मशालीचे स्वागत झाले यावेळी देवळाली कॅम्प नजीकच्या स्कूल ऑफ आर्टिलरी मधील महत्त्वाचा चौक उमराव स्क्वेअर येथे १९७१ व त्यापूर्वीच्या युद्धांमध्ये सहभागी असलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लेफ्टनंट जनरल आर. के. शर्मा आदी सैनिकांच्या विविध तुकड्यांनी तसेच लष्करी बँडच्या तालावर सलामी तसेच मानवंदना देत विजयी मशालीचे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा: मालेगाव शहर दुचाकी चोरट्यांना नंदनवन; तीन दुचाकी चोरींची नोंद

या वेळी तोफखाना केंद्रातील पायलिंग रिंग या ठिकाणी विजयी मशाल घेऊन आलेल्या तुकडीचे प्रमुख राजस्थानातील अलवर येथील 17 जाट रेजिमेंटचे कॅप्टन टीका यांच्याकडून विजय मशाल स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के शर्मा यांनी स्वीकारली व फायर रेंजमधील दर्शनी भागात स्वर्णिम विजय मशालीची स्थापना केली. या प्रसंगी भारतीय सैन्यदलात परंपरागत वापरत असलेली उखळी तोफा तसेच १९७१ च्या युद्धात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या १२० मिलीमीटर मॉर्टन गन, ब्रिटिश काळापासून वापरत असलेली हवीतझर गन, कारगिल युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणारी बोफोर्स तोफ, नुकतीच दाखल झालेली आधुनिक काळातील वज्र तोफ याशिवाय रॉकेट लाँचर या सर्व तोफांनी एकाचवेळी रेंजमधून समोर असलेल्या हरबरा लँड या ठिकाणी तोफा डागल्या व स्वर्णिम विजय मशालीला मानवंदना दिली.
हेही वाचा: नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती मोहिमेची आजपासून अंमलबजावणी

हा ऐतिहासिक सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा व चित्तथरारक होता. तोफखाना केंद्रातील तोपची रेंज या ठिकाणी विजय मशालीची स्थापना झाल्यानंतर तीन पॅराग्लायडर्सनी आकाशातून विजयी मशालींवर पुष्पवृष्टी करुन मानवंदना दिली. याप्रसंगी ग्लायडर्स हे तिरंगी होते जे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे प्रातिनिधिक स्वरुपात होते.
Esakal