नाशिक : पर्यटनाच्या माध्यमातून दिवाळीच्या सुट्यांचा आनंद द्विगुणित करतांना सध्या नाशिककर बघायला मिळत आहेत. यातून शहर व परीसरातील पर्यटनस्थळांवर विक्रमी गर्दी झाली होती. रविवारी (ता.७) गंगापूर रोडवरील बोट क्लब तसेच सभोवतालच्या पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली होती. नाशिककरांच्या आउटींगच्या फिव्हरमुळे अर्थकारणाला चालना मिळते आहे.
निसर्गाच्या सानिध्यात नाशिककर…!
कोरोना महामारी काळात पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे बंद असल्याने पर्यटन ठप्प झाले होते. मात्र गेल्या काही कालावधीपासून निर्बंध शिथिल होतांना, पर्यटनस्थळांवर गर्दी बघायला मिळत होती. त्यातच दिवाळीची सुट्टी असल्याने गेल्या आठवडाभरापासून गर्दीत सातत्याने वाढ नोंदविली जात होती. शनिवार-रविवार अशा वीक-एंडनिमित्त नाशिककरांनी घराबाहेर पडतांना आउटींगचा पुरेपुर आनंद घेतला. प्रामुख्याने गंगापूर धरणालगत असलेल्या बोट-क्लबला पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली होती. उपस्थितांनी बोटींगचाही मनमुराद आनंद घेतला. तर निसर्गाच्या सानिध्यात निवांत होतांना निखळ आनंद अनेकांनी मिळविला. गंगापूर रोडवरीलच सोमेश्वर, बालाजी मंदिर, नवश्या गणपती अशा विविध ठिकाणीदेखील पर्यटकांची लक्षणीय गर्दी राहिली. याशिवाय शहरालगत असलेल्या पर्यटनस्थळांनाही नाशिककरांची पसंती लाभली.
हेही वाचा: नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती मोहिमेची आजपासून अंमलबजावणी

नाशिककरांनी लुटला बोटींगचा मनमुराद आनंद
हॉटेलींगचाही जोर वाढला
फिरुन झाल्यानंतर सह-कुटुंब, मित्र-मैत्रीणींसोबत हॉटेलींगला भर देण्यात आला. त्यामूळे शहरातील हॉटेल्समध्येदेखील गर्दी बघायला मिळाली. ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी व्यावसायिकांनी विद्युत रोषणाईसह हॉटेल्सची आकर्षक सजावट केलेली होती. शहरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांची रेलचेल पहायला मिळाली.
हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात चार दिवसांत आढळले २०३ कोरोना बाधित
Esakal