मुंबई: एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील २२५ पैकी २२० आगारांमधील एसटी वाहतूक ठप्प आहे. या संपाला राज्यातील कामगार संघटनाचाही पाठिंबा मिळू शकतो. तशातच संघर्ष कामगार युनियनने संपूर्ण बंदची हाक दिल्यामुळे राज्यभरात एसटी वाहतूक बंद झाली आहे. एसटी कामगारांच्या संपासंदर्भात मुंबईत आज कृती समितीची बैठक होणार आहे. यात संपाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, कृती समितीमध्ये नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असून सर्वच आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: संप संपेना; बस आगारांतच
मुंबईच्या मेट्रोच्या कामाला ठाकरे सरकारने स्थगितीचे आदेश दिले होते. त्यावेळी भाजपने राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती. असे असतानाच आता केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. “मुंबईची मेट्रो थांबविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता गावाकडची एसटीदेखील थांबवून दाखविली”, अशी बोचरी टीका त्यांनी केली. “या सरकारची ओळख एकच ती म्हणजे ‘सरसकट गैरसोयींचा विकास करणारे महावसुली सरकार’… हे सरकार जनतेचे आणखी किती हाल करणार?”, असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा: उपनगरी लोकल प्रवास बंदी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवणार – केशव उपाध्ये

Keshav Upadhye
राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता अशी मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्यासह वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीबाबत चर्चेचे आश्वासन दिले. काही ठिकाणी कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील आगारामधून या संपाला पाठिंबा मिळत आहे.
Esakal